सिकंदर शेख 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र केसरी विजेत्यास दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 06:17 PM2023-11-13T18:17:22+5:302023-11-13T18:23:35+5:30
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सिंकदरला बोलावून त्याचं कौतुक केलं. तसेच, त्याच्यासाठी सरकारकडे सरकारी नोकरीची मागणीही केली आहे.
मुंबई - सिकंदर शेखने गतवर्षीचा वचपा काढत यंदा महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवलाच. गतवर्षी सिंकदर शेखला पंचाच्या निर्णयाचा फटका बसल्याचा आरोप कुस्तीशौकिनांनी आणि कुस्तीतील काही जाणकारांनी केला होता. त्यामुळे, यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील मैदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यंदाही सिकंदरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदामध्ये आस्मान दाखवले. त्यामुळे, सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. त्यामुळे, सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. त्यातच, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सिकंदरचे कौतुक केलं आहे. मातोश्रीवर जाऊन सिकंदरने उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सिंकदरला बोलावून त्याचं कौतुक केलं. तसेच, त्याच्यासाठी सरकारकडे सरकारी नोकरीची मागणीही केली आहे. सिंकदर, मानाची गदा मिळवताच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गेला होता. त्यावेळी पैलवान सहकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी अन् गुलालाची उधळण करत त्याचे जल्लोषी स्वागत केले. येथील आपल्या वस्तादांच्या घरी जाऊन त्याने त्यांचे दर्शन घेतले. यावेळी, कोल्हापुरात सिंकदरचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर, सिकंदरने आज शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
उद्धव ठाकरेंना भेटून खूप छान वाटलं, त्यांनी पाठीवर शाबासकी दिली. तसेच, तू पुढं चाल मी तुझ्या पाठिशी आहे, तुला काही अडचण असेल तर मला सांग, असंही ते म्हणाल्याचं सिकंदरने माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल त्याने समाधानही व्यक्त केलं. तू २२ सेकंदात महाराष्ट्र केसरीची जिंकली. आत्तापर्यंत ६ मिनिटांपर्यंत ही कुस्ती चालली आहे, पॉईंटवर ही कुस्ती चालायची आणि निकाली ठरायची. मात्र, तू चितपट करुन केवळ २२ सेकंदात अंतिम लढत जिंकल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, असेही सिकंदरने म्हटले.
दरम्यान, माझ्या पुढील महिन्यात कॉम्पिटीशन्स आहेत, मी बाहेरही लढणार आहे. मी हिंद केसरीसाठीही लढणार असल्याचं सिकंदरने सांगितलं.
जितेंद्र आव्हाडांचीही भेट घेतली
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत, मानाची "महाराष्ट्र केसरी" स्पर्धा जिंकणारे मल्ल सिकंदर शेख यांनी आज माझ्या घरी भेट दिली. गेल्या वर्षीच सिकंदर महाराष्ट्र केसरी झाले असते. परंतु वादग्रस्त निर्णयाचा ते बळी ठरलें. पण यावेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्याला कोणतीच संधी न देता अवघ्या 23 सेकंदात अस्मान दाखवले. येणाऱ्या काळात ते भारताच प्रतिनिधीत्व ऑलिंपिकमध्ये करतील याची खात्री आहे. त्यासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्याचा शब्द मी त्यांना दिला आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्र सरकारला, सिकंदर शेख यांना शासकीय सेवेत समविष्ट करून घ्यावे, अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे