मौन हा माझा कमकुवतपणा नाही; सत्य बदलत नाही- रिया चक्रवर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 06:54 IST2020-08-19T04:36:32+5:302020-08-19T06:54:34+5:30
मला माहीत आहे की काहीही झाले तरी सत्य कधीही बदलत नाही, असा खुलासा अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने माध्यमांना दिलेल्या निवेदनात केला.

मौन हा माझा कमकुवतपणा नाही; सत्य बदलत नाही- रिया चक्रवर्ती
मुंबई : मी सुशांतकडून कधीही पैसे घेतले नाहीत. तपासात मुंबई पोलीस आणि ईडीलाही या संदर्भात काहीच संशयास्पद सापडलेले नाही. माझे मौन हा माझा कमकुवतपणा नाही. मला माहीत आहे की काहीही झाले तरी सत्य कधीही बदलत नाही, असा खुलासा अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने माध्यमांना दिलेल्या निवेदनात केला.
मुंबई पोलीस आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी सर्व दस्तावेज तपासले आहेत. त्यांना माझ्याविरुद्ध काहीही संशयास्पद सापडलेले नाही. मी तपास यंत्रणेच्या चौकशीसाठीही तयार आहे. मृत्यूच्या ४० दिवसांनंतर बिहार पोलिसांचे समोर येणे हास्यास्पद आहे.
>म्हणून सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही
सुशांतच्या अंत्यविधीला हजर राहण्यासाठी ज्या २० जणांची नावे दिली होती त्या यादीत माझे नाव नव्हते, असे रियाने स्पष्ट केले. तिच्यावतीने वकील सतीश माने-शिंदे यांनी दिलेल्या दीर्घ निवेदनामध्ये रियाने अनेक बाबींचा उलगडा केला. गेल्यावर्षी डिसेंबरपासून ८ जूनपर्यंत आम्ही एकत्र त्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. त्याची बहीण प्रियांकासोबत सुशांतचे भांडण होऊ लागल्याने त्याने मला काही दिवस तुझ्या घरी जा, असे सांगितल्याने मी निघून गेले. एका पार्टीत एकत्र गेलो असता प्रियांकाने दारुच्या नशेत तिथे अनेकांशी भांडण केले. त्यानंतर घरी परतल्यावर ती व सुशांत पुन्हा दारू पित बसले. मला सकाळी शूटिंगला जायचे असल्याने मी रूममध्ये जाऊन झोपले. सकाळी उठून पहिले असता प्रियांका माझ्या बाजूला झोपली होती. दिनो मोरिया हे इंडस्ट्रीमधील मोठे नाव असल्याने मी त्यांना ओळखत होते आणि भेटत होते, असेही रियाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.