मुंबई - शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवारांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण ठरणार याची चर्चा झडत आहे. त्यासाठी, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह आणखी काही नेत्यांची नावे समोर येत आहेत. मुंबईतील वायबी चव्हाण सभागृहात नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अक्षरश: हुंदके देत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. या प्रक्रियेत पवार कुटुंबातील अजित पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली. मात्र, कायम सोशल मीडियावर सक्रीय असणारे रोहित पवार यांनी अद्यापही मौन बाळगल्याचे दिसते.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हल्ला-कल्लोळ निर्माण झाला असून अनेकजण आपले राजीनामे देत आहेत. राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, या सर्वच घटनांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी सर्वांनाच राजीनामा न देण्याचा आणि शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. तर, सुप्रिया सुळे यांनाही कीहीही न बोलण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, प्रत्येक लहान-सहान बाबींवर, घटनांबाबतही सोशल मीडियावर व्यक्त होणारे आमदार रोहित पवार २४ तासांनंतरही मौन बाळगून आहेत.
शरद पवार यांच्या निर्णयावर पवार कुटुंबातील केवळ अजित पवार यांनीच स्पष्टपणे भाष्य केलंय. इतर कुणीही यावर मत नोंदवलं नाही. त्यातच, रोहित पवार हेही गप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. अद्याप त्यांनी ना मीडियासमोर यासंदर्भात भाष्य केले, ना या घडामोडींवर एखादं ट्विट केलं. त्यामुळे, रोहित पवार गप्प का आहेत, त्यांची या घटनांवर काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीसह त्यांचे इतरही फॉलोवर्स प्रश्नांकित आहेत.