Join us  

धार्मिक ऐक्याचा संदेश घेऊन मालाड-मालवणीकरांचा 'मूक मोर्चा'

By मनोहर कुंभेजकर | Published: April 15, 2023 5:28 PM

मुंबईत - महाराष्ट्रात कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला तरी मालाड- मालवणी नेहमी शांतच राहिली कारण इथल्या जनतेला शांतता व सलोखा हवा आहे.

मुंबई - सर्वधर्मीय नागरिक, स्वयंसेवी संस्था, व्यापारी वर्ग, दुकानदार यांनी एकत्र येऊन  मालाड-मालवणीतील शांती, ऐक्य, सलोखा, सहिष्णूता टिकून रहावी या उद्देशाने आयोजित केलेल्या सर्वधर्मिय 'मूक मोर्चा'ला आज हजारोंचा जनसमुदाय उसळला. हिंदू, मुस्लीम, शिख, ख्रिस्ती, बौद्ध या सर्वधर्मांचे धर्मगुरु व समाजबांधव मोर्चाला उपस्थित होते.मालाड-पश्चिमचे स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख देखील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह या मोर्चात सहभागी झाले.

सर्वधर्मीय बांधवांनी काढलेला 'मूक मोर्चा' पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत मालवणी गेट क्र.०६ येथे अडवला. यानंतर आमदार अस्लम शेख यांच्या समवेत सर्वधर्मांच्या धर्मगुरूंनी मालवणी पोलीस स्थानकात पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरिक्षकांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

"विविधतेतील एकता हीच मालाडची ओळख आहे. ही ओळखच मालाड-मालवणीची ताकद आहे. हीच ओळख अबाधित ठेऊया." "एकता का राज चलेगा हिंदु-मुस्लीम साथ चलेगा."  असे  धार्मिक ऐक्याचा संदेश देणारे फलक या 'मूक मोर्चा'त झळकले.

 यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना अस्लम शेख म्हणाले की, "ही मालाड-मालवणी म्हणजे भारत आहे. अन्यत्र कुठेही दिसणार नाही एवढी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक, भाषिक विविधता येथे आहे. परंतू या विविधतेचे एक वैशिष्ट्य आहे. या विविधतेत पराकोटीची एकता आहे. कितीही बिकट परिस्थिती आली तरी मालाड-मालवणीच्या जनतेने या एकतेला तडा जाऊ दिला नाही.जे कोणी समाजकंटक मालाड-मालवणीतील ऐक्य व सलोखा नष्ट करण्याच्या उद्देशाने  येथे आले होते, त्यांनी आज मालवणीत एकवटलेला भारत पहावा आणि वेळीच सुधारावं. नाहीतर यापुढे गाठ मालाड-मालवणीच्या जनतेशी असेल असा इशारा त्यांनी दिला.

मुंबईत - महाराष्ट्रात कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला तरी मालाड- मालवणी नेहमी शांतच राहिली कारण इथल्या जनतेला शांतता व सलोखा हवा आहे. मात्र रामनवमी दिवशी बाहेरुन आलेल्या लोकांनी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलीसांवर हात उगारुन शिवीगाळ करण्यापर्यंत या समाजकंटकांची मजल गेली, सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा  समाजकंटकांवर कठोरात-कठोर कारवाई होण्याची गरज असल्याचे अस्लम शेख म्हणाले.तसेच कोणत्याही धर्माच्या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देण्याआधी पोलीसांनी आयोजकांकडून प्रतिज्ञापत्राद्वारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचवणार नाही याची हमी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :मुंबई