Join us

मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार

By मनोहर कुंभेजकर | Published: November 01, 2023 7:22 PM

सदर सर्वे येथील मच्छीमारांच्या मासेमारीच्या जागांवर होत आहे.याला येथील मच्छिमारांचा तीव्र विरोध असून येथील मच्छिमार व कोळी महिला पोलिस बळाचा वापर झाला तरी उद्या दि,2 नोव्हेंबर रोजी सदर सर्व्हे बंद पाडणार आहे

मुंबई-वरळी ते बांद्रा  सिलिंक नंतर ,आता भविष्यात बांद्रा ते वर्सोवा सिलिंक त्यानंतर वर्सोवा ते वसई-विरार  अशा पद्धतीने शासनाच्या मार्फत समुद्रात सिलिक बनविण्यात येणार आहे.सदर सिलिंक उभारणीसाठी अचानक कुठलीही सूचना न देता आणि मच्छिमार बांधवांना विश्वासात न घेता दि,30 ऑक्टोबर पासून मढ कोळीवाडा किनाऱ्यापासून दीड किलोमीटर अंतरावर समुद्रात होत असलेला सिलिंक सर्वे मच्छीमारांना विश्वासात न घेता सुरू आहे.त्याला मढ,पातवाडी व भाटी विभागातील सर्व मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे.

सदर सर्वे येथील मच्छीमारांच्या मासेमारीच्या जागांवर होत आहे.याला येथील मच्छिमारांचा तीव्र विरोध असून येथील मच्छिमार व कोळी महिला पोलिस बळाचा वापर झाला तरी उद्या दि,2 नोव्हेंबर रोजी सदर सर्व्हे बंद पाडणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे शेकडो वर्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि या भागांमध्ये होणारा सर्वे बंद पाडण्याची मोहीम मच्छीमार बांधव उद्या दि, 2 नोव्हेंबर रोजी  राबविणारअसल्याची माहिती मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष कोळी यांनी लोकमतला दिली.

सदर सर्व्हे मुळे पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम येथील मढ गाव, पातवाडी गाव, धोंडी गाव, मालवणी गाव, मनोरी गाव तसेच बोरिवली पश्चिम येथील गोराई गाव या ठिकाणचे सर्व मच्छीमार बांधव धास्तावलेले आहेत. पुढे मासेमारी कुठे करायची, उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत येथील मच्छिमार बांधव आहेत.मच्छीमारांवर उपासमारीची पाळी येईल अशा पद्धतीने शासन काहीही सूचना न देता हिटलर शाही पद्धतीने अचानक सर्वे करू पाहत आहे.त्यानंतर कदाचित पुढे आमचे गाव उठवून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न सुद्धा शासनामार्फत होऊ शकतो अशी भीती मच्छीमार बांधवांमध्ये निर्माण झालेली आहे.

आज सकाळी नऊ वाजल्या पासून पोलिसांचे फोन यायला सुरुवात झालेली आहे.  उद्या सदर सर्व्हे बंद पडतांना पोलीस मच्छीमार बांधवांवर लाठीचार्ज करण्याची शक्यता आहे. मात्र सदर लाठीचार्जला मच्छिमार अजिबात घाबरणार नाहीत सदर सर्वे बंद करूनच राहतील व आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना कुठल्याही टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी घेतील अशा पद्धतीचा पवित्रा मच्छिमार बांधवांनी घेतला असंल्याची माहिती संतोष कोळी तसेच भाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील व हरबादेवी मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था पातवाडीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली.