महापालिकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

By admin | Published: January 1, 2017 03:30 AM2017-01-01T03:30:17+5:302017-01-01T03:30:17+5:30

महापालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी वाशीतील भावे नाट्यगृहात हा वर्धापन दिन

Silver Jubilee Anniversary of Municipal Corporation | महापालिकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

महापालिकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी वाशीतील भावे नाट्यगृहात हा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे, तर शहरासह राज्याचे विशेष आकर्षण ठरलेल्या मुख्यालयाच्या इमारतीवर नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला होणारी आतषबाजी पाहण्यासाठी संध्याकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती.
ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई महानगरपालिका १ जानेवारी रोजी २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या कालावधीत देशात नावलौकिकता मिळेल अशी कामे महापालिकेमार्फत झालेली आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्वत:च्या मालकीचे धरण असणारी पहिली महापालिका ठरण्याचाही मान नवी मुंबई महापालिकेने मिळवलेला आहे. त्याशिवाय सर्वोत्तम जमीनभरणा पध्दतीवर आधारित शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सी-टेक मलप्रक्रिया केंद्रे अशा प्रकल्पाप्रमाणेच वंडर्स पार्क, रॉक गार्डन अशी उद्याने पालिकेची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेली आहेत. महिला व बालके, मागासवर्गीय व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ५० हून अधिक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. तर ई-गव्हर्नन्सद्वारे २१ प्रकारच्या नागरी सेवा आॅनलाइन उपलब्ध करून देणारी वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपही सुरू करण्यात आले आहे. अशा विविध उपक्रमांमुळे नवी मुंबई महापालिकेची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्यानुसार रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या औचित्यावर ३१ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत पालिका मुख्यालयाच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला मुख्यालयावरून नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी पाहण्यासाठी अनेकांनी मुख्यालयाबाहेरील आवारात गर्दी केली होती. यावेळी मुख्यालयासमोर सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने रविवारी वाशीतील भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी महापालिकेतर्फे आयोजित ‘प्रतिमा नवी मुंबईची’ या छायाचित्रण स्पर्धेच्या विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेच्या व्यावसायिक गटात १५ तर हौशी गटात २९ छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. प्रसिध्द छायाचित्रकार रणजित काकडे आणि अपूर्व सालकडे यांनी त्यांच्या छायाचित्रांचे परीक्षण केले. त्यामध्ये व्यावसायिक गटातून संदेश रेणोसे, सत्यवान वास्कर, योगेश म्हात्रे, बच्चन कुमार, सुमित रेणोसे, नरेंद्र वास्कर, सुजित म्हात्रे, नितीन किटुकले तर हौशी गटातून सुबोध भोईर, संजय शिंदे, पलक म्हात्रे व अजर नाईक यांच्या छायाचित्रांची निवड झाली आहे. त्यानुसार व्यावसायिक गटातील विजेत्यांना २० हजार तर हौशी गटातील विजेत्यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Silver Jubilee Anniversary of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.