मुलुंडच्या केळकर शिक्षण संस्थेचे यश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीव तंत्रज्ञान, कॉस्मिटोलॉजी यासारख्या विभागांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या मुलुंडच्या केळकर शिक्षण संस्थेच्या साइंटिफिक रिसर्च सेंटरचा रौप्यमहोत्सवी सोहळा अलीकडेच साजरा करण्यात आला. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात केंद्र सरकारच्या जीवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सल्लागार डाॅ. अस्लम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुगंधी द्रव्याची निर्मिती करणाऱ्या प्रसिद्ध केळकर कंपनीचे दिवंगत संचालक भाऊसाहेब केळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली साइंटिफिक रिसर्च ही संस्था सुगंधी वनस्पतीची लागवड व सुगंधी पदार्थांची निर्मिती व संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून मागील पंचवीस वर्षे कार्यरत आहे. या सोहळ्याला लखनऊ येथील सुगंधी व औषधी वनस्पती संशोधन संस्थेचे माजी संचालक डाॅ. अलोक कालरा व बंगळुरू येथील आयटीसी कंपनीतील प्रमुख शास्त्रज्ञ विजयन पद्मनाभन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. वझे केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शर्मा या महाविद्यालयाच्या कार्याची माहिती दिली. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सुरू केलेल्या अद्ययावत सेंटरचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त रमेश वझे यांच्या हस्ते करण्यात आले.
फोटो कॅप्शन
मुलुंड येथील साइंटिफिक रिसर्च सेंटर या प्रख्यात संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित असलेले केंद्र सरकारच्या जीव तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. अस्लम यांचे स्वागत करताना संस्थेच्या विश्वस्त ज्योती भडकमकर. सोबत संस्थेचे अन्य पदाधिकारी.