Join us

अधिक मासात चांदी तेजीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:06 AM

सोने घसरले; चांदीची प्रतिकिलो ५०० रुपयांनी वाढ

जळगाव : अधिक मासामुळे मागणी वाढल्याने चांदीच्या भावात एकाच दिवसात प्रतिकिलो ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी सुवर्ण बाजार बंद झाला, त्या वेळी ४१ हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी सोमवारी ४१ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. मंगळवारीही हेच भाव स्थिर होते. भारतात ब्राझील, लंडन येथून चांदीची आवक होत असते. गेल्या काही महिन्यांपासून चांदीची आवक घटली असून त्यामुळे भावात सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात ३९ हजार रुपये प्रतिकिलो असलेला चांदीचा भाव मार्चअखेर ३९ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. त्यानंतरही वाढ कायम राहत एप्रिल महिन्यात अक्षय्यतृतीयेपूर्वीच चांदी ४० हजारांवर पोहोचली व एप्रिलअखेर ४१ हजारांचा टप्पा चांदीने गाठला. २१ मे रोजी भाव आणखी ५०० रुपयांनी वधारला. गेल्या दोन महिन्यांत अडीच हजार रुपये प्रतिकिलोने चांदीचा भाव वधारला आहे.सोन्याच्या भावात घसरणगेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात आता सतत घसरण होत आहे. अमेरिकेने सोन्यातील गुंतवणूक थांबवून ती शेअर मार्केटकडे वळविल्याने सोन्याचे भाव घसरत आहेत. यासोबतच अमेरिकी संसदेने करांसंदर्भात निर्णय घेतल्याने त्याचाही परिणाम सोन्यावर होऊन भारतीय बाजारपेठेवरही त्याचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे १४ मे रोजी ३१ हजार ९०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होऊन ते ३१ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहेत.

टॅग्स :सोनंशेअर बाजार