Raj Thackeray ( Marathi News ) : मुंबई- हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या या आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची मुक्तता केली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. दरम्यान, आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले असून कुलभूषण जाधव यांचेही लवकरच भारताच्या भूमीवर आगमन होऊ दे, अशी मागणी केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन केंद्र सरकारचे अभिनंदन केले. ट्विटमध्ये म्हटले की, कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. पण भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीने त्या सर्व अधिकाऱ्यांची सुटका झाली, ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन', आता अशीच मुत्सद्देगिरी कुलभूषण जाधव ह्यांच्याबाबत पण दिसू दे आणि लवकरच भारताच्या भूमीवर त्यांचं आगमन होऊ दे ही इच्छा !, अशी मागणीही ट्विटमध्ये केली आहे.
कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका
हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या या आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची मुक्तता केली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. याआधी या प्रकरणात भारताने कतारसोबत राजनैतिक पातळीवर चर्चा केल्यानंतर या आठ जणांना सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा कमी करून कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केल्यानंतर सर्व राजनैतिक माध्यमांचा वापर करून त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर मदत केली जाईल, असं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयानं दिलं होतं. दरम्यान, कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ अधिकाऱ्यांची सुटका झाली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.