Join us  

साध्या, एसी बसचा ‘बेस्ट’ प्रस्ताव रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 3:03 AM

तुटीत असलेले वातानुकूलित बसमार्ग बेस्टने बंद केले. मात्र या बसगाड्यांना पर्याय म्हणून साध्या व वातानुकूलित मिडी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तुटीत असलेले वातानुकूलित बसमार्ग बेस्टने बंद केले. मात्र या बसगाड्यांना पर्याय म्हणून साध्या व वातानुकूलित मिडी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार होत्या. मात्र हा प्रस्ताव म्हणजे खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप करीत बेस्ट समिती सदस्यांनी विरोध दर्शविला होता. तरीही हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत आज मंजुरीसाठी आणण्यात आला. त्यामुळे तांत्रिक सबब दाखवून बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठविला आहे.बेस्टच्या ताफ्यातील सुमारे आठशे बसगाड्यांचे आयुर्मान संपले आहे़ यापैकी अनेक बसगाड्या ताफ्यातून काढल्याने बसगाड्यांच्या फेऱ्या कमी करणे, काही बसमार्ग बंद करण्याची वेळ बेस्टवर आली़ तूट वाढतच असल्याने नव्या बसगाड्यांची खरेदी बेस्टच्या खिशाला परवडेनाशी झाली आहे़ अखेर साध्या व वातानुकूलित मिडी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. मात्र सुरुवातीपासूनच या प्रस्तावाला सर्वपक्षीय सदस्यांचा विरोध होता. हा विरोध कायम ठेवत बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठविण्यात आला. वर्षभरापूर्वी तयार झालेला हा प्रस्ताव वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर आणला आहे. त्यामुळे या बसगाड्यांच्या खर्चामध्ये आता वाढ झाली असण्याची शक्यता आहे. नव्या दराप्रमाणे व सध्या लागू असलेल्या जीएसटीप्रमाणे किती खर्च अपेक्षित आहे, याची माहिती द्यावी. खासगी बस चालवल्यावर होणारा छुपा खर्च किती? याची सविस्तर माहिती सादर करावी. तसेच खासगी बसमध्ये कंडक्टर नसल्याची कल्पना कर्मचारी युनियनला द्यावी, अशा मागण्या सुनील गणाचार्य, सुहास सामंत व रवी राजा या बेस्ट समिती सदस्यांनी केल्या. प्रशासन प्रस्तावावर ठामयावर बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी खासगी बसगाडीसाठी जास्त खर्च येईल, असे मला वाटत नाही. तरीही काही बदल होत असल्यास त्यानुसार अंमल करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निविदाविना मिडी बसची खरेदीमिनी वातानुकूलित बस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव कोणतीही निविदा प्रक्रिया न करता सादर करण्यात आल्याने समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. वातानुकूलित बसमध्ये कंडक्टर नसल्याने या बस फक्त आरएफआयडी कार्ड ज्यांच्याकडे आहे अशा प्रवाशांसाठीच चालवणार का? बसचालक कंडक्टरचेही काम करणार का? याबाबत मान्यताप्राप्त युनियनची परवानगी घेतली आहे का? खासगी व वातानुकूलित गाड्या बेस्टच्या आगारामध्ये उभ्या राहणार आहेत, खासगी कंपन्यांचे कर्मचारीही आगारात ये-जा करणार असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असे प्रश्न सदस्यांनी केले.