मुंबईत महाशिवरात्री साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:08 AM2021-03-13T04:08:38+5:302021-03-13T04:08:38+5:30
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वतीने यंदाची महाशिवरात्री साधेपणाने व कोरोनाचे सर्व ...
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वतीने यंदाची महाशिवरात्री साधेपणाने व कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनामुळे मुंबईतदेखील महाशिवरात्री साधेपणाने साजरी करण्यात आली. गुरुवारी मुंबईतील काही शिवमंदिरे बंद ठेवण्यात आली होती. काही मंदिरांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या भक्तांनाच प्रवेश देण्यात आला होता. मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध असे बाबुलनाथ मंदिरदेखील भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. या वेळी मुंबईतील काही शिवमंदिरांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाशिवरात्रीला देशभरात अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. मुंबईतील अनेक शिवमंदिरांत तसेच विविध मंडळांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवमंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी लोटते. दरवर्षी महादेवाच्या भक्तांचा महाशिवरात्रीला उपवास असतो, तसेच मंदिरांमध्ये शिवलिंगावर दूध अर्पण करून विधिवत पूजा केली जाते. रात्री जागरण करून महादेव आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा उत्सव साजरा करण्यात येतो.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी नव्हती; मात्र, मुंबईतील सर्व मंदिरांमध्ये फुलांची सजावट तसेच भव्य रोशणाई करण्यात आली होती. काही मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली तरीदेखील भाविकांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येत मंदिराचे दर्शन घेतले. या वेळी ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’ असा जयघोष करण्यात आला. मुंबईतील जुहू बीचवर एका कलाकाराने शंकराचे वाळूशिल्प साकारत अनोख्या पद्धतीने महाशिवरात्री साजरी केली. अनेक भाविकांनी घरबसल्याच शिवमंदिरांचे ऑनलाइन दर्शन घेतले.