Join us

"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:30 AM

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठिशी भाजप असल्यावर भूमिका मांडली

मुंबई - राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. तर, दुसरीकडे धनगर आणि ओबीसी समाजही रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. त्यासाठी, सरकारने २५ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दुसरीकडे मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेत ओबीसी नेत्यांनी महाएल्गार मेळावा सुरू केला आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ओबीसी एकत्र येत आहेत. त्यावरुन, भुजबळांना आत्ताच ओबीसी आठवले का, ते कधी ओबीसींचे नेते झाले अशी टीका होत आहे. 

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठिशी भाजप असल्यावर भूमिका मांडली. छगन भुजबळ हे मी आमदार व्हायच्या आधीपासून ओबीसींचा विषय मांडतात. त्यामुळे, त्यांनी काल आणि आज ओबीसींचा विषय हातात घेतला, असे मला वाटत नसल्याचे फडणवीसांनी म्हटले. तसेच, भुजबळ भाजपाची स्क्रीप्ट वाचतात का? असा प्रश्न केला असता. कालपर्यंत भुजबळ आमच्यासोबत नव्हते, तेव्हा जे आमच्यासोबत होते ते आमची स्क्रीप्ट वाचत होते. आता, भुजबळ आमच्यासोबत आले आहेत, तर आता ते आमचं स्क्रीप्ट वाचतात. म्हणजे आमचं स्क्रीप्ट फारच पॉप्युलर दिसतंय. प्रत्येकाला आमचं स्क्रीप्ट आवडायला लागलं आहे, असे म्हणत फडणवीसांनी भुजबळांच्या प्रश्नावर न्यूज १८ लोकमतशी बोलताना उत्तर दिले. 

राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे आपल्या भाषणातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तर, छगन भुजबळही जरांगे यांच्यावर प्रखर शब्दात टीका करताना त्यांची खिल्लीही उडवत आहेत. त्यामुळे, मराठा समाजांकडून छगन भुजबळ यांना विरोध केला जात आहे. तर, ओबीसी बांधवही जरांगे पाटलांच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करत रस्त्यावर उतरत आहेत. 

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीसछगन भुजबळअन्य मागासवर्गीय जाती