मुंबई: अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली. 19 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीच्या वाटेला अवघ्या 8 जागा आल्या.
या विजयानंतर भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे. ठिकाठिकाणी भाजप आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. दरम्यान, संतोष परब मारहाण प्रकरणात नाव आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे बेपत्ता आहेत. ते अचानक गायब झाल्यानंतर काही अज्ञातांनी ठाण्यातील वागळे इस्टेट येथे नितेश राणेंविरोधात बॅनर लावले होते. पण, आता हे बॅनर भाजपकडून काढण्यात आले आहेत.
फटाके फोडून जल्लोष
आजच्या विजयानंतर कोकणापासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते फटाके फोडून आणि पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करत आहेत. ठाण्यातही भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. ठाण्यातही ज्या ठिकाणी नितेश राणेंविरोधात पोस्टर लावले होते, ते पोस्टर काढण्यात आले असून, भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून जल्लोष केला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल हाती
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलचे 11 आणि शिवसेना, मविआ पुरस्कृत पॅनेलचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये शिवसेना नेते आणि विद्यमान जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
भाजपाचेही दिग्गज नेते राजन तेली हे पराभूत झाले आहेत. संतोष परब मारहाण प्रकरण त्यानंतर नितेश राणेंच्या निकटवर्तींयांना अटक करून थेट नितेश राणेंवर झालेले आरोप, नंतर झालेली कोर्ट कचेरी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ही चांगलीच गाजली होती.