सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा - राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:06 AM2021-09-13T04:06:27+5:302021-09-13T04:06:27+5:30
मुंबई : गणेशोत्सव काळातच मुंबई विद्यापीठाने आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. ...
मुंबई : गणेशोत्सव काळातच मुंबई विद्यापीठाने आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरण स्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी आणि आदर्श शैक्षणिक परिसर होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत रविवारी मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्घाटन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे व रत्नागिरीनंतर विद्यापीठाचे सिंधुदुर्ग हे तिसरे उपकेंद्र आहे. उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते. मंत्री उदय सामंत व कुलगुरू सुहास पेडणेकर दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विद्यापीठातील तसेच देशविदेशातील तज्ज्ञ व प्राध्यापकांना सिंधुदुर्ग परिसर येथे निमंत्रित करावे. तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे. कालांतराने सिंधुदुर्ग उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजेत, अशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.