'सिंधुदुर्गात फिल्मसिटी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही'; अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली भावना

By संजय घावरे | Published: December 19, 2023 07:25 PM2023-12-19T19:25:31+5:302023-12-19T19:27:03+5:30

कोकण चित्रपट महोत्सवात 'सरला एक कोटी'ची सरशी.

sindhudurg will not rest until film city actor vijay patkar expressed the feeling | 'सिंधुदुर्गात फिल्मसिटी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही'; अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली भावना

'सिंधुदुर्गात फिल्मसिटी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही'; अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली भावना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोकणातील निसर्ग आणि लोकेशन्स अत्यंत सुंदर असल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलाकार-तंत्रज्ञांनी इथे येऊन चित्रपट, वेब सिरीज, मालिका, म्युझिक व्हिडीओ शूट करायला हवे. निसर्गरम्य सिंधुदुर्गामध्ये फिल्मसिटी होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. कोकणातील कलावंतांची कला जगभर पोहोचवण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंच कायम अग्रेसर राहील आणि मी इथेच म्हातारा होईन असे अभिनेते विजय पाटकर म्हणाले. 'कोकण चित्रपट महोत्सव' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

कोकण चित्रपट महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष असून, यंदा मालवणमधील मामा वरेरकर नाट्यगृहात प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या कलाकारांच्या परफॅार्मन्सने सजलेल्या या सोहळ्यात 'सरला एक कोटी' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या, अभिनेता ओमकार भोजनेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि प्रियदर्शनी इंदलकरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरले. 'सरला एक कोटी'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नितिन सुपेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता ओमकार भोजने, सर्वोत्कृष्ट संगीतकार विजय नारायण गवंडे असे चार महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. 'ती फुलराणी' चित्रपटासाठी प्रियदर्शनी इंदलकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'तमाशा LIVE'मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्याचा, तर 'वाळवी'तील व्यक्तिरेखेसाठी नम्रता संभेरावला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे (दगडी चाळ २), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक मनीष राजगिरे (धर्मवीर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रकाश भागवत (गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात), लक्षवेधी अभिनेता संदीप पाठक (विठ्ठल माझा सोबती), सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट 'घे डबल', विशेष चित्रपट पुरस्कार 'गोष्ट एका पैठणीची', लक्षवेधी चित्रपट 'बापल्योक', सर्वोत्कृष्ट कथा मकरंद माने-विठ्ठल काळे (बापल्योक), सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार वासुदेव राणे (दगडी चाळ २), सर्वोत्कृष्ट संकलक  जयंत जठार (टाइमपास ३), सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव (धर्मवीर), लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब, सर्वोत्कृष्ट लघुपट 'पाळी', सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक अनिकेत मिठबावकर, कोकणात चित्रीत करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ 'मोरया रे...', सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शक नितीन दत्ता सातोपे (मोरया रे) यांना प्रदान करण्यात आले.

विशेष पुऱस्कारांमध्ये सचिन चिटणीस, श्रेयस सावंत आणि प्रेरणा जंगम यांना पत्रकारितेसाठी 'सिंधुरत्न पत्रकार पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. अभिनेत्री अर्चना नेवरेकर पुरस्कार यांना कोकणची शान पुरस्कार यांना देण्यात आला. प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, पंढरीनाथ कांबळी, दिगंबर नाईक, संतोष पवार यांना 'कोकणरत्न पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. लीना नांदगावकर यांना 'सिंधुरत्न कोकण कन्या पुरस्कार' देण्यात आला. दिगंबर नाईकने मालवणी भाषेत, तर संदीप पाठकने मराठवाडी शैलीत पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सिंधुरत्न कलावंत मंचचे सचिव विजय राणे यांनी आभार प्रदर्शन केले.

सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गणपतीच्या आरतीने पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. दिगंबर नाईकने मालवणी स्टाईलने गाऱ्हाणे घातले. पूजा सावंत, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, हेमलता बाणे, मीरा जोशी, मेघा घाडगे, शुभंकर तावडे, संतोष पवार, पॅडी कांबळे, अभिजीत चव्हाण, आनंदा कारेकर, आरती सोळंकी, सुहास परांजपे यांच्या नृत्य-अभिनयाने कोकण चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली. या सोहळ्याला प्रमोद जठार, बाबा परब, नरेंद्र पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग कलावंत मंचाचे प्रकाश जाधव, यश सुर्वे, प्रमोद मोहिते, उमेश ठाकूर, शितल कलापुरे, मनोज माळकर, गणेश तळेकर यांचे सहकार्य लाभले. 

११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोत्सवाचे उदघाट्न करण्यात आले होते. १२, १३ व १४ डिसेंबरला महोत्सवात सहभागी झालेले चित्रपट दाखवण्यात आले. १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी झाले. १६ डिसेंबरला पुरस्कार वितरण समारंभाच्या रूपात महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला.

Web Title: sindhudurg will not rest until film city actor vijay patkar expressed the feeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा