Join us  

Sindhutai Sapkal : .. तेव्हा व्हील-चेअरवरुन सिंधुताई राजदरबारात गेल्या, राष्ट्रपतीही आले होते धावून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 10:38 PM

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार वितरण सोहळा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 च्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

ठळक मुद्देया पुरस्कारासाठी माई व्हील चेअरवरुन राजदरबारात पोहोचल्या होत्या. 

मुंबई - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्‍या पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच वितरण करण्यात आले होते. त्यावेळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचाही पद्मश्री पुरस्कारने सन्मान करण्यात आला. अनाथांची माय म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी पुरस्कार स्विकारला. त्यावेळी, राष्ट्रपती कोविंद हे आपल्या खुर्चीवरुन पायऱ्या उतरुन खाली आले होते. माईंच्या निधनानंतर सिंधुताईंच्या पद्मश्री पुरस्कार सोहळ्यातील आठवणी सोशल मीडियावर शेअर होत आहेत. 

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार वितरण सोहळा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 च्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी माई व्हील चेअरवरुन राजदरबारात पोहोचल्या होत्या.  सिंधुताईंच्या पुरस्कारावेळी राष्ट्रपती खुर्चीपासून पायऱ्या उतरुन खाली आले आणि पुरस्कार देऊन सिंधुताईंचा सन्मान केला होता. सिंधुताईंना पायाने चालता येत नव्हते, त्यामुळे त्यांना व्हील चेअरवरुन पुरस्कारासाठी राजदरबारात नेण्यात आलं होतं. सिंधुताईंचा राजभवनाती हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आज, माईंच्या निधनाने ती आठवण जागी झाली. 

दरम्यान, सिंधुताई सपकाळ गेली चार दशके अनाथांच्या आई म्हणून काम करीत. म्हणुनच, त्यांना प्रेमाने त्यांची सारी लेकरे ‘माई’ म्हणतात. सपकाळ यांना डॉक्टरेटची उपाधीही म‍िळालेली आहे

सिंधुताईंनी घेतला अखेरचा श्वास

अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कारानं देखील गौरविण्यात आलं होतं.

टॅग्स :सिंधुताई सपकाळराष्ट्राध्यक्षरामनाथ कोविंदपद्मश्री पुरस्कार