मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोरेलच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी तज्ज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली आहे़ आपत्कालीन परिस्थितीत मोनोच्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ट्रकवरील बूम लिफ्टस्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोनोरेलसाठी सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीएने सिंगापूरमधील कंपनीची निवड केली आहे.
एमएमआरडीएने मोनोरेलच्या सुरक्षेसाठी या कंपनीसोबत करारही करण्यात आला आहे. लवकरच या कंपनीचे तज्ज्ञ मुंबईत येऊन मोनोरेलची स्थानके आणि मोनोरेलच्या मार्गाची पाहणी करणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मोनो मार्गावर बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोनोमध्ये बिघाड झाल्यास मोनोरेल जागीच उभी करावी लागते. अनेकदा प्रवाशांंना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेऊन क्रेनचा वापर करावा लागला होता. यामुळे या मार्गावर कोणतीही गंभीर घटना होऊ नये म्हणून एमएमआरडीएने सुरक्षा उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तातडीने बाहेर काढता यावे यासाठी दहा बूम लिफ्ट्स ट्रक खरेदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी मोनोरेल मार्गावर म्हैसुर कॉलनी येथे मोनोरेलच्या गाडीला आग लागल्याची घटना घडली होती, तर यानंतर अनेक महिने मोनोरेल बंद ठेवावी लागली होती. दुसरा टप्पा सुरू झाला तेव्हा वीज खंडित झाल्याने मोनोरेल जागीच थांबवावी लागल्याची घटना घडली होती. या वेळी प्रवाशांना गाडीतून बाहेर काढणे जिकिरीचे झाले होते. यामुळे एमएमआरडीएने मोनोरेलसाठी सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे ठरवले आहे.