कोलकाता : लाइव्ह कार्यक्रम सुरू असताना अचानज श्वास गुद्मरू लागला... छातीत कळ येऊ लागली... हॉस्पिटलमध्ये नेता नेताच अखेर श्वास थांबला... आणि बॉलिवूडचे प्रख्यात गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ केके काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या मृत्यूने एकीकडे हळहळ व्यक्त होत असताना आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या. मात्र, केके यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचा निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला आहे.
केके यांच्या निधनाची पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली होती. शवचिकित्समध्ये मात्र कारण स्पष्ट झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. गुरुवारी दुपारी अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नेमके काय घडले?
पोलिसांनी सांगितले की, गाण्यांच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी केके हॉटेलमध्ये परतले. ते ज्या हॉटेलमध्ये राहात होते तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे. केके यांचे कोलकातात दोन महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम होते. नझरूल मंच सभागृहामध्ये केके यांनी कार्यक्रम सादर केल्यानंतर शेकडो चाहत्यांचा त्यांना गराडा पडला होता.
तिथून हॉटेलवर आल्यानंतरही काही चाहत्यांबरोबर त्यांनी छायाचित्र व सेल्फी काढले. त्यानंतर केके हॉटेलमध्ये जिन्यातच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात आणले असताना डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. केके खाली कोसळल्यानेच त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस व ओठांच्या कडेला जखमा झाला होत्या.