मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांची एक संपूर्ण टीम त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले होते. आता त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी लता दीदींच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. लता मंगेशकर या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी यापूर्वी दिली.
लतादीदींची प्रकृती खालावल्याचे वृत्त येताच, त्यांच्या भगिनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, भाऊ हृदयनाथ मंगेशकर, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, दिग्दर्शक मधूर भांडारकर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात धाव घेतली.