गायक पपॉनने घेतलं स्पर्धक मुलीचं चुंबन; 'व्हॉईस ऑफ इंडिया'च्या सेटवरची होळी वादात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 01:03 PM2018-02-23T13:03:54+5:302018-02-23T13:04:06+5:30
मला रिअॅलिटी शो मधील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते.
मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पपॉन हा टेलिव्हिजनवरील एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्यामुळे अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'व्हॉईस ऑफ इंडिया' या टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शोच्या होळी स्पेशल भागाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला. पपॉन या कार्यक्रमात परीक्षक आणि स्पर्धकांचा मार्गदर्शक (मेंटॉर) आहे. होळी स्पेशल भागाचे चित्रीकरण सुरु असताना पपॉन सगळ्या लहान मुलांना रंग लावत होता. मात्र, त्याने यापैकी एका स्पर्धक मुलीच्या गालाला रंग लावल्यानंतर तिचे चुंबन घेतले. या सगळ्या प्रसंगाचे चित्रण करून तो व्हिडीओ पपॉनच्या फेसबूक पेजवर लाईव्ह करण्यात आला होता . सुरुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, हे फेसबुक लाईव्ह पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील वकील रुना भुयान यांनी आक्षेप घेत पपॉनविरुद्ध पॉस्को कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. रूना भुयान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अल्पवयीन मुलीशी अशाप्रकारचे वर्तन करणे धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला रिअॅलिटी शो मधील मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते. याठिकाणी स्पर्धकांमध्ये अनेक अल्पवयीन मुली आहेत. मात्र, त्यावेळी तिथे एकही महिला क्रू मेंबर नव्हती, असा आक्षेप रुना भुयान यांनी तक्रारीत नोंदवला आहे.
या तक्रारीमुळे पपॉन चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. होळी स्पेशल भागाचे चित्रीकरण सुरू असताना पपॉन आनंदी मूडमध्ये होता. यावेळी चित्रीत करण्यात आलेला व्हिडिओ पपॉनच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आला. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात पपॉन स्पर्धक मुलीचे चुंबन घेताना दिसत आहे. मंगळवारी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. तेव्हापासून या व्हिडिओला 68 हजार पेजव्ह्यूज मिळाले आहेत.
#Delhi: Supreme Court advocate Runa Bhuyan files a complaint against singer Papon for 'inappropriately kissing a minor girl' who is a contestant on a reality TV show. pic.twitter.com/uqTT10YpiD
— ANI (@ANI) February 23, 2018