Join us

गायक शंतनू मुखर्जी म्हणताे, मुंबईकरांनो, बाहेर जाऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:55 AM

आपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

मुंबई :

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत २० मे रोजी मतदान होत आहे. तेव्हा नागरिकांनो, तुम्ही गावाला किंवा बाहेर जाऊ नका, मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, असे भावनिक आवाहन प्रसिद्ध गायक शंतनू मुखर्जी यांनी मतदारांना केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघांतर्गत रविवारी सकाळी आर. व्ही. टेक्निकल स्कूल, खार जिमखाना येथे ‘व्होट टू व्होट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंतनू बोलत होते. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भागवत गावंडे, प्राचार्या नेहा जगतयानी उपस्थित होते. 

आपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. २० मे रोजी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असल्यास ते एक दिवस पुढे ढकलावे. मीसुद्धा मतदानाच्या दिवशी मुंबईतच राहणार असल्याचे शंतनू यांनी सांगितले.    

जागृती रॅलीत नागरिकांनी ‘आपलं मत आपला अधिकार’, ‘बुढे हो या जवान-सभी करे मतदान’, ‘माय व्होट- माय फ्यूचर’, ‘आपका व्होट आपकी ताकत- आपका मत आपका अधिकार’ आदी घोषणाही दिल्या. या रॅलीत नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

टॅग्स :मुंबई