वैशाली भैसने-माडे यांचा पोलिसांनाच 'पिंगा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:25 AM2022-02-24T11:25:44+5:302022-02-24T11:26:30+5:30
जीवाला धोका, तरी अद्याप तक्रार नाही; तपासात अडथळे
मुंबई : ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय, जीवाला धोका आहे’ अशा ‘फेसबुक’ पोस्टद्वारे खळबळ उडवणाऱ्या ‘पिंगा ग पोरी पिंगा’ गीत फेम पार्श्वगायिका वैशाली भैसने-माडे यांनी अजूनही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. तक्रार दाखल करण्याबाबत पोलिसांकडून सातत्याने विचारणा होत असतानाही त्या दरवेळी वेगवेगळी कारणे देत असल्याने पोलिसांनाच त्यांच्यामागे पिंगा घालण्याची वेळ आली आहे.
तक्रार करण्यास उशीर का ?
पार्श्वगायिका वैशाली भैसने-माडे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याबाबत तक्रार दाखल करावी, जेणेकरून पोलिसांना पुढील तपास करणे सोपे जाईल अशी विचारणा करण्यात येत आहे. मात्र, एकदा तब्येत ठीक नसल्याचे कारण त्यांनी दिले. तर दुसऱ्यांदा शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले. त्यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची भीती असताना त्या तक्रार दाखल करण्यास इतका उशीर का करत आहेत? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
तपास कामात अडथळे
त्यांनी फेसबुकवर ज्यावेळी पोस्ट टाकली होती. त्यावेळीदेखील अंधेरी पोलिसांच्या निर्भया पथकाने त्यांच्या घरी धाव घेत बराच वेळ त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही त्यांनी ‘मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे, त्यामुळे मी परत आले की पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर दाखल करेन’ असा निरोप वरिष्ठ अधिकाऱ्याला दिला होता. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी अडथळे येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगत माडे यांनी लवकरात लवकर तक्रार दाखल करावी, अशी विनंतीही केली आहे. माडे यांनी दोन दिवसात पत्रकार परिषद घेण्याचेदेखील फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र तीदेखील त्यांनी घेतलेली नाही.