Join us  

सिंग इस्टेट रहिवासीयांना मिळाला न्याय, उपमुख्यमंत्र्यांचे पालिका प्रशासनाला आदेश

By मनोहर कुंभेजकर | Published: June 12, 2023 4:39 PM

नागरिकांची घरे बाधित न होता विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबई : मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील कांदिवली (पूर्व ) प्रभाग क्र.२६ सिंग इस्टेट १२० फूट रुंदीकरणात तेथील जवळपास ४५० घरे बाधित होणार होती. यासाठी मागाठाणेचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी वारंवार बैठका घेऊन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले  होते.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहात भेट घेऊन सिंग इस्टेट येथील रस्ता वळवून दुसऱ्या बाजूने घ्यावा, जेणेकरून जास्त घरे बाधित होणार नाहीत आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी विनंती त्यांना केली होती.

याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तेथील नागरिक बेघर होऊ नयेत व त्यांना स्थलांतरित करू नये यासाठी पिलर ( खांब ) बांधून त्यावरून रस्ता बनविण्याचे पालिका प्रशासनाला आदेश दिले .यामुळे आता तेथील नागरिकांची घरे बाधित न होता विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

यावेळी पालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलारसू, परिमंडळ ७च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे,आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित तळेकर,आणि इतर संबंधित अधिकारी तसेच शाखाप्रमुख सचिन केळकर,महिला शाखाप्रमुख  हेमलता नायडू,राजाराम चव्हाण,राजा जाधव,महेश सातारकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई