लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम विविध क्षेत्रांसह कलाक्षेत्रावरही झाला आहे. मनोरंजन क्षेत्रात एकपात्री कलाकार व त्यांचे कार्यक्रम हाही एक महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाच्या काळात या कलावंतांचेही कार्यक्रम बंद पडले. परिणामी, एकपात्री कलावंतांनी स्वीकारलेला 'मार्ग एकला' सध्या बिकट वळणावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने काही ज्येष्ठ एकपात्री कलावंतांनी मांडलेली ही भूमिका.
सरकारने लक्ष देणे ही काळाची गरज
रसिकांना तीन तास मंत्रमुग्ध करण्याची ताकद असलेले एकपात्री कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करणे आयोजकांना कमी खर्चाचे व सोपेही असते; पण कोरोनाच्या संकटातून मुक्तता होऊन एकूणच कार्यक्रम कधी सुरू होतील ते काहीच सांगता येत नाही. जवळ साठविलेली पुंजीसुद्धा या काळात संपली आहे. म्हणूनच सरकारनेही आम्हा एकपात्री कलाकारांकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे.
- विसुभाऊ बापट (ज्येष्ठ रंगकर्मी, 'कुटुंब रंगलंय काव्यात')
लोकांना मनोरंजनाची गरज आहे
लॉकडाऊनमध्ये एकपात्री कलाकारांचे कार्यक्रम बंद झाले; पण काही एकपात्री कलाकारांनी फेसबुक व यूट्यूब लाईव्ह असे विनामूल्य कार्यक्रम केवळ घरी बसलेल्या रसिकांच्या मनोरंजनासाठी सुरू केले. त्यातूनच काही एकपात्री कलाकारांना फेसबुक लाईव्ह किंवा एखाद्या ग्रुपच्या झूम मीटिंगमध्ये कार्यक्रम करण्यासाठी निमंत्रण मिळाले; पण ते प्रमाण अतिशय नगण्य आहे. पण लोकांना आता मनोरंजनाची गरज आहे, हेही तितकेच खरे आहे.
- दीपक रेगे (अध्यक्ष, 'एकपात्री कलाकार परिषद', महाराष्ट्र)
चरितार्थाचा एकमेव मार्ग बंद झाला
गेल्या सव्वा वर्षाच्या काळात एकपात्री कार्यक्रमांवर वाईट परिणाम नक्कीच झाला आहे. ज्यांनी स्वतःला एकपात्री कलाकार म्हणून वाहून घेतले आहे, त्यांच्या स्थितीचा इतर कुणी विचारच करू शकत नाहीत. आमच्या चरितार्थाचा तोच एकमेव मार्ग आहे. लॉकडाऊनच्या काळात फारतर पाच-सहा ऑनलाइन कार्यक्रम झाले. भविष्यकाळात कार्यक्रम करतच राहणार; पण आता ते मांडण्याचे संदर्भ बदलले आहेत हे नक्की. पूर्वीसारखे कार्यक्रम आता अजून वर्षभर तरी होतील की नाही याबद्दल साशंक आहे.
- जयंत ओक (ज्येष्ठ रंगकर्मी, 'गप्पागोष्टी'कार)
धीराने वाट पाहणेच हाती आहे
कोरोनामुळे अनेकांची दुर्दशा झाली आहे. त्यामध्ये एकपात्री कलाकारही होरपळले गेले आहेत. कोरोनाच्या काळात सर्वच ठप्प झाल्याने काही करताच येत नव्हते. कालांतराने लॉकडाऊन जरा शिथिल झाला; मात्र नाटकांना गती येत नव्हती. 'नटसम्राट', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' ही नाटके समाजमाध्यमांवर एकपात्री स्वरूपात सादर केली. सध्या एकूणच भवितव्य अंधारात असल्यासारखे वाटत आहे. तरीही पुन्हा सगळे सुरू होण्याची धीराने वाट पाहतोय.
- उपेंद्र दाते (ज्येष्ठ रंगकर्मी, 'रंगमंच' नाट्यसंस्था)