एकच सीईटी संकल्पनेला पीसीएम निर्णयामुळे मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:06 AM2021-03-17T04:06:33+5:302021-03-17T04:06:33+5:30
संकल्पनेची चाचपणी सुरू; यंदा अंमलबजावणी नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांसाठी अनेक सीईटी परीक्षा ...
संकल्पनेची चाचपणी सुरू; यंदा अंमलबजावणी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांसाठी अनेक सीईटी परीक्षा घेतल्या जातात. मात्र आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांसाठी एकच सीईटी परीक्षा शक्य आहे का, याची चाचपणी सध्या सर्व स्तरावर सुरू आहे. त्यातच एआयसीईटीने अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, गणित, रसायसनशास्त्रासारखे (पीसीएम) प्रवेश बंधनकारक नाहीत अशी तरतूद केली आहे आणि त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्यावर सोपविला आहे. या तरतुदीमुळे एकच सीईटी संकल्पनेच्या चाचपणीला अधिक बळकटी मिळणार असल्याची प्रतिक्रिया सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी एआयसीटीईकडून विद्यार्थ्यांना मिळालेल्या नवीन लवचीक धोरणाची सध्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि तज्ज्ञांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. एआयसीटीईच्या २०२१-२२ वर्षाच्या प्रवेशांसाठी जारी केलेल्या हस्तपुस्तिका अनावरणावेळी या तरतुदीमुळे इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी प्रवेशाची दालने कशी खुली होतील हे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले. तसेच जेईई आणि त्या त्या राज्यांच्या अभियांत्रिकी प्रवेशांसाठीच्या सीईटीवर परिणाम होणार नसल्याचेही सांगितले. दरम्यान, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र हे विषय बंधनकारक नसतील तर अभियांत्रिकीच्या पीएसीएम व पीसीबी गटात होणाऱ्या सीईटीला काय महत्त्व उरणार? असा सवाल तज्ज्ञ, पालकांकडून उपस्थित केला जात आहे. याचा अर्थ अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यातील एमएचटी-सीईटी बंद होणार का, असा संभ्रम विद्यार्थी, पालकांमध्ये आहे.
* १६ ऐवजी एकाच सीईटीवर लक्ष केंद्रित करता यावे हा उद्देश!
विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, अद्याप असा काहीही निर्णय झालेला नसून राज्यात १६ सीईटींऐवजी एकच सीईटी घेता येईल का, या संकल्पनेची सध्या केवळ चाचपणी सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या दहावी व बारावीच्या कला, विज्ञान, गणित यासारख्या विषयांसह सामान्यज्ञान, कौशल्ये, इतर वैकल्पिक समान विषय यांचा समावेश करून एकच सीईटीची संकल्पना राबविता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांना २-३ सीईटी न देता एकाच सीईटीवर लक्ष केंद्रित करता यावे हा त्यामागील उद्देश असेल असे जाेशी स्पष्ट केले. मात्र याची अंमलबजावणी लगेचच हाेणार नसून त्याच्या प्रक्रियेवर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..............................