जलपर्यटनावर परिणाम; फेरीबोट व्यावसायिक संकटात
सुहास शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेट वे ऑफ इंडियावरून अलिबाग, घारापुरी किंवा अन्य ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे. मात्र, चाचणीसाठी एकच काऊंटर उपलब्ध करून दिल्याने लांबच लांब रांगा लागत आहेत. या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने पर्यटक ‘गेट वे’वरून माघारी जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील जलपर्यटनाला फटका बसला असून, फेरीबोट व्यावसायिक संकटात आहेत.
गेट वे ऑफ इंडियावरून दररोज अलिबाग किंवा अन्य ठिकाणी जलमार्गाने ये-जा करणाऱ्यांची संख्या जवळपास दहा हजारांच्या आसपास आहे. शनिवार, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ही संख्या दुप्पट होते. गेल्या काही दिवसांपासून येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र चाचणीसाठी येथे केवळ एकच काऊंटर उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांच्याही नाकीनऊ येत आहेत.
‘गेट वे’वगळता इतर धक्क्यांवर कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे येथील प्रवासी आणि पर्यटक अन्य धक्क्यांवरून प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भाऊचा धक्का किंवा पोर्ट ट्रस्टच्या डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनलवर दररोज मोठी गर्दी असते. तेथील प्रवाशांच्या कोरोना चाचणीचे काय, ‘गेट वे’वरील फेरीबोट चालकांना त्रास देण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे का, असा सवाल गेट वे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सरचिटणीस किफायत ऊर्फ मामू मुल्ला यांनी उपस्थित केला.
* अडचण काय?
गेट वेवरून जलमार्गे अलिबाग किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी बरेच पर्यटक ऑनलाइन बुकिंग करतात. काही प्रवासी बोट सुटण्याच्या आधी १०-१५ मिनिटे येऊन तिकीट खरेदी करतात. परंतु, कोरोना चाचणीसाठी बराच वेळ लागत असल्याने फेरीबोट सुटते. अशा वेळी त्यांचे पैसे वाया जातात. चाचणीच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांसाठी बोट उभी करून ठेवल्यास पुढील वाहतुकीचे नियोजन कोलमडते. त्यामुळे बऱ्याचदा निम्म्याहून अधिक रिकाम्या बोटी घेऊन मार्गस्थ व्हावे लागते, अशी माहिती पीएनपी फेरीबोट सेवेचे व्यवस्थापक रोहन फणसेकर यांनी दिली.
.......
९० टक्के नुकसान
कोरोना चाचणी सुरू केल्यापासून पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे फेरीबोट व्यावसायिकांचे जवळपास ९० टक्के नुकसान होत आहे. अंतर नियम पाळण्यासाठी आधीच ५० टक्के क्षमतेने सेवा सुरू होती. आता तर १०-१५ प्रवासी घेऊन बोट मार्गस्थ करावी लागत आहे. यामुळे व्यावसायिक संकटात आले आहेत.
- किफायत ऊर्फ मामू मुल्ला, सरचिटणीस, गेट वे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्था
............
चाचणीचे काऊंटर वाढवा
कोरोना चाचणीसाठी केवळ एक काऊंटर उभारल्याने लांबच लांब रांगा लागत आहेत. या गर्दीत संसर्ग होण्याची अधिक भीती आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चाचणीच्या काऊंटर्सची संख्या वाढविण्याची गरज आहे.
- रौैफ मालवणकर, फेरीबोट व्यावसायिक