काेराेनामुक्त रुग्णांसाठी लसीचा एकच डाेस प्रभावी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:42 AM2021-05-06T02:42:42+5:302021-05-06T02:42:51+5:30
अमेरिकेतील अभ्यास अहवाल; देशातही संधाेधन गरजेचे
मुंबई : अमेरिकेतील इम्पिरियल कॉलेज, क्वीन मॅरी युनिर्व्हसिटी आणि युनिर्व्हसिटी कॉलेजच्या संशोधनानुसार, जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांचासाठी लसीचा एकच डोस प्रभावी ठरत आहे. अशा कोरोनामुक्त लोकांसाठी कोरोना लसीचा एकच डोस विषाणूविरोधात लढण्यासाठी प्रभावी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करीत आहे. मात्र अमेरिकेतील या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरही अशा स्वरूपाचे अभ्यास संशोधन केल्यानंतर याविषयी अंतिम निष्कर्षावर पोहोचणे सोपे होईल, त्यासाठी संशाेधनाची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.
अमेरिकेतील अभ्यास संशोधन अहवालानुसार, ज्या रुग्णांना आधी कोरोनाची बाधा झाली किंवा ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत किंवा एकही लक्षण नाही अशा नागरिकांवर लसीचा एकच डोस अधिक प्रभावशाली ठरत आहे. मात्र, ज्या लोकांना कोरोना झालाच नाही अशांनी लसीचा पहिला डोस घेऊनही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती. त्यामुळे अशांना कोरोना होण्याचा धोकाही अधिक होता, असेही या अभ्यासातून समोर आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले, आपल्याकडील कोरोनाचा विषाणू, बदलते स्ट्रेन, भारतीयांची रोग प्रतिकारक शक्ती, लसीकरण यावर संशोधन होणे गरजेचे आहे. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ एक डोस घेणे उपयुक्त आहे की नाही हे ठरविता येईल. मात्र सध्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी दोन्ही डोस घेणे अतिशय गरजेचे आहे. यंत्रणांना साहाय्य करून न घाबरता लसीकरणासाठी पुढाकार घेण्यात यावा.
‘लसीविषयी गैरसमज नको’
लसीकरणाकडे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. संसर्गाची शक्यता लसीकरणामुळे अतिशय कमी होते, तसेच सहआजार असलेल्या रुग्णांनाही लसीकरणामुळे संरक्षण मिळते. लस घेतल्यानंतर संसर्ग झाला, तर तो तीव्र स्वरूपाचा असणार नाही. लसीकरणातील दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल, विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा फैलाव कमी होईल. त्याला पुढे जाण्यासाठी वाट मिळणार नाही. संसर्गाची साखळी तोडण्यासाठीही मदत होईल. त्यामुळे अधिकाधिक लोक लसीकरण करतील, तेव्हा सामूहिक रोगप्रतिकारकशक्ती तयार होईल. त्यासाठी आपली वेळ आल्यावर निश्चितच लस घ्या. - डॉ. राघवेंद्र शिंगणे