Join us  

लंडनच्या संग्रहालयात शिवरायांचा एकेरी उल्लेख; रोहाच्या वनश्री शेडगे हिची लेखी तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 7:38 AM

लंडन येथील संग्रहालयामध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता.

धाटाव :

लंडन येथील संग्रहालयामध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. रोहा तालुक्यातील वनश्री समीर शेडगे या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार संग्रहालय प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. तसा मेल तिने त्यांना पाठविल्यानंतर यात तत्काळ बदल केला जाईल, असे संग्रहालय प्रशासनाने कळविले आहे.

या संग्रहालयात भवानी तलवार. ढाल, चिलखत व कट्यार, वाघनखे हा शिवकालीन खजिना आहे. वनश्री लंडनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे  शिक्षण घेत आहे. संग्रहालयामधील दुर्मीळ वस्तू पाहातानाचच एशियन विभागाकडे तिचे लक्ष गेले. येथे महाराजांच्या काळातील तलवारी, चिलखते, कट्यारी आढळून आल्या. तिची नजर शिवरायांच्या भवानी तलवारीकडे गेली तेव्हा उत्स्फूर्तपणे शिवरायांचा जयजयकार केला.

ई-मेलही पाठविला  म्युझियममधील १२ नंबरवर भवानी तलवार, तर २२ नंबरच्या रॅकमध्ये वाघनखे ठेवण्यात आली होती.   मात्र, त्यावरील लेबलवर शिवरायांचा एकेरी उल्लेख वनश्रीच्या लक्षात आला.   तिने तत्काळ हा प्रकार तेथील प्रशासनाच्या लक्षात आणून दिला.   तसा मेलही तिने त्यांना पाठविला.   या तक्रारीनंतर संग्रहालयाच्या व्यवस्थापनाने वनश्रीला  ईमेलद्वारे संपर्क साधत लवकरच एकेरी उल्लेख काढून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे लिहिणार असल्याचे कळविले आहे.   वनश्रीचे शिवभक्तांकडून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज