देशात कायदे लादण्यासाठी दबावाचे राजकारण - सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:07 AM2020-01-09T06:07:21+5:302020-01-09T06:07:41+5:30
एनआरसी, सीएए आणि एपीआर हे सर्व एकच आहे. एनआरसी ही तर अराजकतेची सुरुवात असून कायदे लादण्यासाठी देशात दबावाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.
मुंबई : एनआरसी, सीएए आणि एपीआर हे सर्व एकच आहे. एनआरसी ही तर अराजकतेची सुरुवात असून कायदे लादण्यासाठी देशात दबावाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. देशात चाललेल्या सर्व परिस्थितीबाबत ९ जानेवारीला गांधी शांती जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आशीष दीक्षित उपस्थित होते. ही गांधी शांती यात्रा अपोलो बंदर मुंबई, गेट वे आॅफ इंडिया येथून निघून पुढे गुजरात, साबरमती आश्रम, पोरबंदर, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रमुख शहरात जाणार आहे. त्यानंतर ३० जानेवारीला महात्मा गांधीजींची समाधी राजघाट दिल्ली येथे या यात्रेची समाप्ती होणार आहे. यावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, सरकार आपला अजेंडा राबविण्यासाठी दबाव आणत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही. परंतु एनआरसी, सीएए आणि एपीआरविरोधात जण आक्रोश उफाळून आला आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यशवंत सिन्हा म्हणाले, एनआरसी, सीएए आणि एपीआर याची घोषणा संसदेत केली होती. ते कायदे मागे घेण्याची घोषणा संसदेत करावी अशी मागणी आहे. तसेच या कायद्यांविरोधात आंदोलने करणाऱ्यांवर अत्याचार होत आहेत. तसेच लोकांवर अन्याय झाला आहे, उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये आंदोलन चिरडले जात आहे.
तर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने केलेला काळा कायदा मागे घ्यावा. डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्याची आज धमकी दिली जात आहे. विद्यापीठात हल्ले, जेएनयूमध्ये सरकारी गुंड आले आणि शिक्षक, विद्यार्थ्यांना मारले. पण देशाच्या परिस्थितीवर कोणी बोलायला तयार नाही.