मुंबई : सायन, चुनाभट्टी, कुर्ला पूर्व, चेंबूर, टिळक नगर येथील दररोजच्या वर्दळीच्या परिसरांमध्येदेखील शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांव्यतिरिक्त रस्त्यांवर कोणीच पाहायला मिळत नव्हते. सायन येथील सायन कोळीवाडा, सायन सर्कल, चुनाभट्टी येथील एव्हरार्ड नगर, कुर्ला पूर्व येथील एस. जी. बर्वे मार्ग, कुर्ला सिग्नल टिळक नगर येथील रेल्वे स्थानक परिसर, चेंबूरमधील सुमन नगर, उमरशी बाप्पा चौक या परिसरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापाऱ्यांनीदेखील १०० टक्के बंद पाळला होता. सायन-पनवेल मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी पोलीस वाहनांमध्ये बसलेल्या नागरिकांची चौकशी करीत होते. तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडलेल्या नागरिकांना समज देऊन पुन्हा घरी पाठविण्यात येत होते.
चेंबूर कुर्ला परिसरात वाइन शॉप मालकांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र तळीरामांनी दुकानांच्या बाहेर ठिय्या मांडला होता. एस. जी. बर्वे मार्गावर भरणारी बाजारपेठ, चेंबूरमधील कॅम्प, लालडोंगर तसेच रेल्वे स्थानक परिसरात भरणारी बाजारपेठ व सायन कोळीवाडा येथील मुख्य बाजारपेठदेखील बंद ठेवण्यात आली होती. या सर्व परिसरामध्ये पोलीस व महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत होते.