सायन उड्डाणपूल २० एप्रिलपासून दोन महिने वाहतुकीस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 03:00 AM2019-03-30T03:00:58+5:302019-03-30T03:01:17+5:30
सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिलपासून सुरू करण्यात येईल.
मुंबई : सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. या कामासाठी साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या काळात वाहनचालकांना उड्डाणपुलाखालील रस्ता हा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध असेल.
सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठका पार पडल्या. उड्डाणपुलाला एकूण १७० बेअरिंग असून दोन महिन्यांच्या कालावधीत ते बदलण्यात येणार आहेत. २० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या कालावधीत उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ण बंद करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास असल्याने काम होईपर्यंत पुलावरील वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविले आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री सायन उड्डाणपुलाच्या कठड्याबाहेरील भागातून दहा बाय पंधरा सेंटीमीटर भागातील प्लॅस्टरचा तुकडा खाली पडला. याबाबत योग्य ती खबरदारी घेतली आहे. मुख्य उड्डाणपुलाचा कुठलाही भाग खराब झालेला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.