मुंबई- वाहतुकीची कायम वर्दळ असलेला सायन उड्डाणपूल दोन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 20 एप्रिलपासून या उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असून, बाहेरगावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. पावसाळ्यात या पुलावर प्रचंड खड्डे पडले होते, त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात ते बुजवण्यात आले. परंतु आता तो पूल दुरुस्त करण्यात येणार आहे. 20 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने 20 जूनपर्यंत सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’तील एका अधिकाऱ्यानं दिली आहे.
सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईनं केले होते.आयआयटीनं दिलेल्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सायन उड्डाणपुलाच्या प्लास्टरचा भाग कोसळला होता.या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नव्हती, म्हणून तो तात्काळ दुरुस्त करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई शहराला जोडणारा सायन येथील पूल दुरुस्तीसाठी दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत मुंबईची वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होणार आहे.