सायन रुग्णालय : २७ हजार मातांनी केले ‘दूधदान’, तीन वर्षांत मातृदुग्ध पेढीसाठी माता सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:47 AM2018-01-08T02:47:07+5:302018-01-08T02:50:07+5:30
आईचे दूध न मिळाल्यामुळे जगभरात दरवर्षी १३ लाख ते १८ लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी जगभर मातृदुग्ध पेढीची संकल्पना अस्तित्वात आली आहे.
स्नेहा मोरे
मुंबई : आईचे दूध न मिळाल्यामुळे जगभरात दरवर्षी १३ लाख ते १८ लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी जगभर मातृदुग्ध पेढीची संकल्पना अस्तित्वात आली आहे. आशिया खंडातील सर्वांत पहिली मातृदुग्ध पेढी सायन रुग्णालयात सुरू झाली. गेल्या तीन वर्षांत या दुग्धपेढीत २७ हजार ३२४ मातांनी दूधदान केले आहे. दान केलेल्या मातृ दुधाचे संकलन, तपासणी, प्रक्रिया, साठवण वाटप केले जाते. हे दूध अशा बालकांसाठी वापरले जाते ज्यांचे या मातांशी कुठलेही नातेसंबंध नसतात.
मातृदुग्ध पेढीसाठीचे दाते हे या रुग्णालयातील किंवा रुग्णालयाबाहेरील माता असू शकतात. दूध हाताने किंवा पंपाच्या साहाय्याने एका कंटेनरमध्ये जमवले जाते. दुग्धदान करणाºया आईला एचआयव्ही, कावीळ बी, सी, व सिफिलिस नसल्याची तपासणी करून खातरजमा केली जाते. त्यानंतर दूध ६२.५ डिग्री सेल्सिअसला उकळून त्याचे पाश्चरायझेशन केले जाते. त्यानंतर हे दूध ४ डिग्री सेल्सिअसवर ३ दिवसांपर्यंत व २0 डिग्री सेल्सिअसवर १२ तासांसाठी साठवून ठेवले जाते. मग जशी गरज पडेल तसे हे दूध गरजू नवजात शिशूंना दिले जाते. देशात सध्या १३ मातृदुग्ध पेढ्या असून त्यापैकी मुंबईत पाच आहेत. त्यामध्ये जे.जे. रुग्णालय, सायन रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, ठाणे, के.ई.एम. रुग्णालय, नायर रुग्णालय यांचा समावेश आहे.
गेल्या दशकापासून अनेक कारणांनी, विशेषत: मानसिक तणावांमुळे दूध येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच नवजात शिशूंमध्येही जंतुसंसर्ग किंवा इतर आजारांमुळे त्यांना आईचे दूध मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे. आईला दूध कमी येण्याची समस्या शहरी भागात जास्त आहे.
एकीकडे ही परिस्थिती असताना ग्रामीण स्त्रियांमध्ये जास्त दूध येत असल्यामुळे स्तन कडक होणे, दुखणे अशा समस्या दिसून येतात. म्हणून बºयाचदा स्त्रिया हे जास्तीचे दूध काढून फेकून देतात. या पेढीच्या माध्यमातून हा असमतोल दूर करून दूध कमी येणाºया व दूध जास्त येणाºया दोन्ही मातांना लाभ होतो आहे, असे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले.
तीन प्रकारच्या दुधाची साठवण
या दुग्धपेढीत साठवलेले दूध तीन प्रकारचे असू शकते. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चार-पाच दिवसांत आईकडून मिळालेल्या दुधाला ‘कॉलोस्ट्रम’ म्हणतात. सहसा हे दूध डायरिया, कुपोषण, गंभीर जंतुसंसर्ग व भाजलेल्या बाळासाठी राखून ठेवले जाते.
यानंतर पुढील ५ ते १0 दिवसांत जमवलेल्या दुधाला ‘ट्रान्झिशनल मिल्क’ म्हणतात. यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. त्यानंतर जमवलेल्या दुधाला ‘मॅच्युअर मिल्क’ म्हणतात.