Join us

सायन हॉस्पिटल अपघात; चौकशी समिती स्थापन, आठवडाभरात समिती देणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 8:55 AM

ही समिती सात दिवसांच्या आत महापालिका प्रशासनाला अहवाल देणार असून, त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.   

मुंबई : सायन रुग्णालयाच्या परिसरात न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांच्याकडून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई महापालिकेने आता एकसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. ही समिती सात दिवसांच्या आत महापालिका प्रशासनाला अहवाल देणार असून, त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.   

गेल्या महिन्यात २४ मे रोजी संध्याकाळी रुग्णालय परिसरात डॉ. डेरे यांची गाडी ६० वर्षीय महिलेच्या अंगावरून गेली. तेथील नागरिकांनी व सुरक्षा रक्षकांनी त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. डेरे यांना सायन पोलिसांनी अटक केली.

तपासादरम्यान त्यांना जामिनावर सोडण्यात आले तसेच त्यांची बदली नायर रुग्णालयात करण्यात आली. या घटनेच्या ९ दिवसांनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने सामान्य प्रशासन विभागाचे सह. आयुक्त मिलिंद सावंत यांची एकसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमाचा अभ्यास करून सात दिवसांच्या आत महापालिकेला अहवाल सादर करणार आहे.

डॉ. डेरेंवर ठपका या प्रकरणात डॉ. डेरे यांनी ज्यावेळी महिलेला उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल केले त्यावेळी त्यांनी चुकीची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. तसेच डॉ. डेरे यांनी ही माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठातांना कळविली नव्हती. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या छातीमधील दोन्ही बाजूंच्या बरगड्यांमध्ये रक्त साखळल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :सायन हॉस्पिटल