लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्यातील अपघाताची घटना ताजी असतानाच सायन रुग्णालयात कार्यरत डॉ. राजेंद्र डेरे यांच्या गाडीने रुग्णालयाच्या आवारात एका वृद्ध महिलेला उडविले. त्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉ. डेरे हे सायन रुग्णालयात न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, शनिवारी रात्री उशिरा डॉक्टरला अटक केली. मात्र, या प्रक्रियेस एवढा विलंब का झाला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रुबेदा शेख (वय ६०, रा. मुंब्रा कौसा) यांच्यावर सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. १६ तारखेला त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्या ड्रेसिंग करण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. ड्रेसिंग करून रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ नजीकच्या परिसरात त्या झोपल्या होत्या. संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास डॉ. डेरे यांची गाडी तेथून जात असताना जुबेदा यांच्या अंगावर चढली. हा प्रकार कळताच जुबेदा यांना तत्काळ अपघात विभागात नेण्यात आले; पण त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रुबेदा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. शनिवारी दुपारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायन पोलिसांनी गाडी चालक डॉ. डेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनाच उशिरा मिळाली माहिती
पोलिसांनी शनिवारी सकाळी या महिलेला पाहिले असता त्यांच्या अंगावर जखमा आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत माहिती काढली असता ती गाडी डॉ. डेरे यांची असल्याचे निष्पन्न झाले; पण रुग्णालयाकडून अपघाताची माहिती त्याचवेळी पोलिसांना का देण्यात आली नाही, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.