सायन हॉस्पिटलमध्ये महिलेला चिरड्यानंतर डॉक्टरने दिली खोटी माहिती; पोलिसांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:08 PM2024-09-03T15:08:16+5:302024-09-03T15:13:55+5:30
सायन रुग्णालयाती वृद्ध महिलेल्या मृत्यूबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप डॉ. राजेश डेरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Mumbai Crime : काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात एका डॉक्टरने रुग्णालयाच्या आवारात एका महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वृद्ध महिलेला चिरड्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात सायन रुग्णालयाच्या न्यायवैदक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांच्याविरुद्ध सायन पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुबेदा शेख या ६० वर्षीय महिलेच्या मृत्यूबाबत डॉ. राजेश डेरे यांनी खोटी माहिती दिली आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जुबेदा शेख या मधुमेहग्रस्त होत्या. त्यांच्या हाताला जखम होऊन ती चिघळल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर १६ मे रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. जखम झालेल्या हाताला मलमपट्टी करण्यासाठी चार दिवसांपासून जुबेदा शीव रुग्णालयात येत होत्या. मलमपट्टी करुन घरी जाण्यासाठी निघालेल्या जुबेदा यांच्यावर डॉ.डेरे यांनी गाडी चढवली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा नोंदवत डॉ. डेरे यांना अटक केली होती. त्यानंतर 20,000 रुपयांच्या रोख जामिनावर डॉ.डेरे यांची सुटका करण्यात आली होती. आता या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रातून डॉ.डेरे यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संध्याकाळी साडेसातच्या सुमारास डॉ.डेरे यांनी शेख यांच्यावर गाडी चढवली होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. सुरुवातीला डॉ.डेरे यांनी दावा केला होता की शेख यांना चक्कर आली. त्यामुळे त्या खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ही दिशाभूल करणारी माहिती रुग्णालयाच्या रुग्णांच्या इलेक्ट्रॉनिक नोंदींमध्ये टाकण्यात आली होती. गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आले. त्यांचा वाचवण्याचे प्रयत्न करूनही काही तासांनंतर शेख यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर तो मुलगा शाहनवाजकडे सोपवण्यात आला.
मात्र स्वतंत्र साक्षीदारांनी हॉस्पिटलच्या आवारात एका वरिष्ठ डॉक्टरने महिलेला चिरडल्याचे सांगितल्याने पोलिसांना संशय आला. पोलिस तपासादरम्यान डॉ.डेरे यांनी सहकार्य केले नाही, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. जेव्हा डॉ. ढेरे हे शेख यांच्या अंगावरुन गाडी नेत असल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले तेव्हा या प्रकरणाला कलाटणी मिळाली. आरोपपत्रात म्हटलं आहे की, शेख यांचा व्हिसेरा अहवाल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला गेला आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून सायन रुग्णालयातील १२ डॉक्टरांचे जबाब नोंदवले. जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या समितीने शेखच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आणि शवविच्छेदन केले आणि त्यांचा मृत्यू अपघातानंतर झालेल्या अनेक जखमांमुळे झाला असा निष्कर्ष काढला.