मुंबई : पतीसोबतच्या किरकोळ भांडणातून, सायन रुग्णालयाच्या २९ वर्षीय पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर अश्विनी पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना, शनिवारी मध्यरात्री घडली. अश्विनी ही चार महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडा कॉलनी परिसरात पाटील दाम्पत्य साडेतीन वर्षांच्या मुलासोबत राहण्यास आहे. अश्विनी सायन रुग्णालयात एमडी पॅथॉलॉजिस्ट, तर मनोज केईएम रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून कामाला होते. त्यात अश्विनी ४ महिन्यांची गरोदर होती. गेल्या काही दिवसांपासून अश्विनी आणि मनोजचे आई-वडील घरी आले होते. शनिवारी सायंकाळी अश्विनी कामावरून घरी परतली. त्यानंतर बाळ रडत असतानाही, मनोज फोनवर बोलण्यास दंग असल्याचे पाहून, तिने ‘मुलाकडे लक्ष देत नाही.. सतत फोनवर बोलत असतो...’असे म्हणत वाद घातला. त्यानंतर ती रागाने बेडरूममध्ये गेली. रात्री पुन्हा मनोजसोबत वाद घालून ती बेडरूममध्ये गेली. रात्री उशिरापर्यंत ती बेडरूमबाहेर न परतल्याने, कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर रात्री पावणेतीनच्या सुमारास मनोजने बेडरूमचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद न आल्याने, दरवाजा तोडून त्याने आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा अश्विनी चादरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. रुग्णालय उभारण्याचे स्वप्न...वैद्यकीय शिक्षण घेत असताना, अश्विनी आणि मनोज प्रेमात पडले. दोघेही उच्चशिक्षत आणि उच्चभ्रू कुटुंबातील होते. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून अश्विनीने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर अंबाजोगाईच्या एसआरटीआर वैद्यकीय महाविद्यालयातून तिने पॅथॉलॉजिची पदव्युत्तर पदवी घेतली. सहा वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला. ३० आॅगस्टपासून ती सायन रुग्णालयाच्या पॅथॉलॉजिस्ट विभागात एसएमओ पदावर एक वर्षांच्या बॉण्डवर कार्यरत होती. जळगावमध्ये जागा विकत घेऊन, त्यावर स्वत:चे रुग्णालय बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते.तणावामुळे आत्महत्यातणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकदा लोकांची चिडचिड होत विचारक्षमता कमी होते. लहानशा भांडणातही आपल्यासमोरील सर्व मार्ग संपल्याची भावना बळावते. अशा परिस्थितीत असणाऱ्यांना समजून घेणे, त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे असते. यातून आपण बाहेर पडणार नाही, अशी भीती निर्माण झाल्यामुळे, त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना प्रबळ होत जाते. एखादी छोटीशी घटनाही त्यांना आत्महत्येस प्रवत्त करू शकते. - युसूफ माचिसवाला, मानसोपचारतज्ज्ञचांगले व्यक्तिमत्त्व हरपले...डॉ. अश्विनी ही एक चांगली व्यक्ती होती. कामातील नीटनेटकेपणामुळे आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे ती पार पाडत होती. तिच्यासारख्या मुलीने आत्महत्या केली, यावर विश्वास बसत नाही. - डॉ. अलका कलगुटकर, पॅथॉलॉजी विभागप्रमुख, सायन रुग्णालय
सायन रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
By admin | Published: February 23, 2016 2:36 AM