सायन रुग्णालयात आता ‘निर्भया केंद्र’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 04:39 AM2018-10-29T04:39:40+5:302018-10-29T04:40:21+5:30
लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसा, विनयभंग, अॅसिड हल्ला अशा घटनांतील पीडितांसाठी सायन रुग्णालयात लवकरच ‘निर्भया केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे.
- स्नेहा मोरे
मुंबई : लैंगिक अत्याचार, घरगुती हिंसा, विनयभंग, अॅसिड हल्ला अशा घटनांतील पीडितांसाठी सायन रुग्णालयात लवकरच ‘निर्भया केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील वैद्यकीय तज्ज्ञांना उपचार करणे सोपे होणार आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितेच्या शरीरासोबतच मनावरही खोल घाव झालेले असतात. ही बाब केंद्रस्थानी ठेवून सायन रुग्णालयात लवकरच हे केंद्र सुरू करण्यात येईल.
मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात हे केंद्र काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात मानसोपचारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, न्यायवैद्यक तज्ज्ञ असे विविध शाखेतील तज्ज्ञ एकाच वेळी पीडितेवर उपचार करतात. यापूर्वी केईएमच्या मानसोपचार विभागात अशा पीडितांवर उपचार केले जायचे. याविषयी, केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये प्राथमिक पातळीवर स्थिर करणे गरजेचे असते. त्यामुळे पीडितांच्या उपचारासाठी या केंद्राची मोठी मदत होणार आहे.
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, सायन रुग्णालयात अशा प्रकरणातील अनेक पीडित सातत्याने येत असतात. साधारण महिन्याला असे ५० रुग्ण येथे येतात, तर केईएममध्ये अशा १०-१२ रुग्णांवर महिन्याला उपचार करण्यात येतात. त्यामुळे आता सायन रुग्णालयाही या केंद्रासाठी विशेष जागा देण्यात आली आहे.