लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सायन रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर्सना डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोच्या विळख्यात राहावे लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. इंटर्न डॉक्टर्सने याविषयी वारंवार रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. मात्र, ‘लोकमत’मधील वृत्तानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली असून, आवारात स्वच्छतेला वेग आला आहे. रुग्णालय आवारातील भंगारच्या वस्तू आणि साठलेला कचऱ्याचा ढीग प्रशासनाने हालचाल करीत त्वरित स्वच्छ केला आहे.सामान्यांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचाच जीव सायन रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे टांगणीला लागला होता. जवळपास रुग्णालयात एकूण १०५ इंटर्न डॉक्टर्स आहेत. त्यापैकी ५५ डॉक्टर्स वसतिगृहात, तर ३० बराकमध्ये (बैठ्या खोल्या) राहतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने उचललेले हे पाऊल डॉक्टरांना दिलासा देणारे आहे.या अस्वच्छेतकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. परंतु रुग्णालयाच्या आवारात वेगाने स्वच्छता होत आहे, अशी माहिती असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतीक मारकवाड याने दिली.
सायन रुग्णालयाचे आवार ‘चकाचक’
By admin | Published: June 25, 2017 3:42 AM