Join us  

सायन-पनवेल महामार्ग अंधारात

By admin | Published: April 12, 2017 2:54 AM

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून, काँक्रिटीकरणासाठी तब्बल पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या महामार्गावर अनेक उड्डाण पूल आहे.

- वैभव गायकर, पनवेलसायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून, काँक्रिटीकरणासाठी तब्बल पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. या महामार्गावर अनेक उड्डाण पूल आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हा महामार्ग बांधला असून, सध्या सायन-पनवेल टोलव्हेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून टोल वसूल करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीडी बेलापूर ते कळंबोली सर्कल या पाच ते सहा किमीच्या रस्त्यावरील दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे चालकांना केवळ अंदाज घेऊनच वाहने चालवावी लागतात. महामार्गावरील अंधारामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. महामार्गावर निर्देशक पट्टेही पुसट झाले असून, दुरुस्ती, साईडपट्ट्यांची रंगरंगोटीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने, चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सायन-पनवेल महामार्ग केवळ हा देशातील व्यस्त राष्ट्रीय महामार्गांपैकी एक म्हणून ओळखला जातो. देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणाऱ्या या महामार्गावर अंधारच सावट ही खरोखर खेदजनक बाब आहे. विशेष म्हणजे, महामार्गाच्या रुंदीकरणानंतर या ठिकाणी कोट्यवधीं रुपये खर्च करून शोभेचे फुलपाखरूच्या आकाराची कलाकृती असलेले पथदिवे बसविण्यात आले होते. मात्र, हे पथदिवे सध्या केवळ देखाव्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत. याच रस्त्यावरून रायगड, कोकण परिसरातील लोकप्रतिनिधीही मार्गक्रमण करतात. त्यामुळे हा महामार्ग अंधारात असल्याची दखल त्यांनी घेणे अपेक्षित होते. दोन वर्षांपासून महामार्गावरील अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यापैकी कामोठे उड्डाणपुलाचा प्रश्नदेखील गंभीर आहे. या ठिकाणच्या रखडलेल्या कामांमुळे कामोठेमधील जवळजवळ ३० हजारपेक्षा जास्त वाहनांना फटका बसत आहे. महामार्गाची जबाबदारी सध्या सायन-पनवेल टोलव्हेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर आहे. मात्र, ही कंपनी केवळ टोल वसूल करण्याचे काम करीत आहे. वाहन चालकांच्या सुरक्षेची हमी मात्र राजभरोसे असल्याचे चित्र आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा सायन-पनवेल टोलव्हेज असो, हे आपली जबाबदारी लक्षात घेऊन या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्याची मागणी चालकांकडून होत आहे.पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील अर्धवट कामे पूर्ण करणे गरजेची आहे. या संदर्भात तत्काळ उपाययोजना राबविल्यास, पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील. या संदर्भात वाहतूक पोलिसांनी पत्र लिहूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे. . सायन-पनवेल महामार्गावरील अंधाराच्या सावटामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. या संदर्भात बांधकाम विभागाला निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. भीषण अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येईल का? - रूपेश घरत, अध्यक्ष, खारघर शहर, काँग्रेस पक्ष पथदिवे बंद असल्याने रस्त्यावरील पट्टे दिसत नाही. समोर चाललेल्या वाहनाचाही अंदाज येत नाही. त्यामुळे आपली चूक नसतानाही जिवावर बेतू शकते. - गणेश ठाकूर, वाहन चालक