नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून हा मार्ग आजपासून वाहतुकीस पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते कळंबोलीजवळच्या एक्सप्रेस हायवेपर्यंत पोहचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत साधारण अर्ध्या तासाची बचत होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) माध्यमातून मुंबईतील बीएआरसी (ट्रॉम्बे) जंक्शन ते कळंबोली दरम्यानच्या २३.0५ किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करून तो दहा पदरी करण्यात आला आहे. त्यासाठी १२२९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सायन-पनवेल रोडवेज प्रा.लि. या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला होता. या मार्गावर चेंबूर-मानखुर्द लिंक रोड, सानपाडा जंक्शन, उरण फाटा, कामोठे आणि तळोजा जंक्शन असे एकूण पाच उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या पुलांचे काम पूर्ण झाले असून ते आजपासून वाहतुकीला खुले करण्यात आले आहेत.सीबीडी खिंडीची उंची कमी करून रुंदीकरण करण्यात आले आहे.त्यामुळे येथील वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे. तसेच उरण फाट्यावर या खिंडीला जोडून उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांचा मार्ग सुकर झाला आहे. तर सानपाडा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे एपीएमसीकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक्सची चांगली सोय झाली आहे. एकूणच पुणे, पनवेल, गोवा आणि कोकणात जाणाऱ्या वाहनांना हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. तसेच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीनेही या रस्त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)
सायन-पनवेल महामार्ग खुला
By admin | Published: July 02, 2014 12:44 AM