सायनचा ऐतिहासक किल्ला दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 02:59 AM2020-12-05T02:59:13+5:302020-12-05T03:05:32+5:30

१६ व्या शतकात ब्रिटिशांनी केले होते बांधकाम

Sion's historic fort awaits repair; Neglected by the Department of Archeology | सायनचा ऐतिहासक किल्ला दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

सायनचा ऐतिहासक किल्ला दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

Next

मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या सायनच्या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा किल्ला दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. सोळाव्या शतकात ब्रिटिशांनी या किल्ल्याचे बांधकाम केले असल्याने हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एक तासाच्या आत हा संपूर्ण किल्ला पाहून होतो. यामुळे आजही भटकंती करण्याकरिता अनेक मुंबईकर या किल्ल्यावर आवर्जून जातात. मात्र किल्ल्यावरील पडझड झालेले अवशेष व वाढलेले गवत आजही जैसे थे असल्याने अनेकांचा या किल्ल्यावर येऊन हिरमोड होत आहे. 

सायनच्या किल्ल्यावर प्रवेश करताच पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आहे. हा किल्ला पुरातत्त्व विभाग व मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. किल्ल्यावरील उद्यानाची देखभाल पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र जसजसे आपण किल्ल्याच्या वरील भागात जातो तसतसे वाढलेले गवत व पडझड झालेले अवशेष नजरेस पडतात. मुंबईतील सायन, धारावी, माहिम, वांद्रे, वरळी, शिवडी व माझगाव येथील किल्ले ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. सर्व किल्ल्यांची डागडुजी करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास मुंबईकरांचा या किल्ल्यांकडे ओढा वाढेल. 

ऐतिहासिक महत्त्व
इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला.
या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी व माहिम खाडीमार्गे होणार्‍या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.
किल्ल्याचे तट, बुरूज, ब्रिटिश कार्यालयाचे अवशेष, दारूचे कोठार, तोफा व चौकोनी हौद या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

सायनचा किल्ला पुरातत्त्व विभाग व मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याने किल्ल्यावरील उद्यानाची देखभाल तसेच आजूबाजूची साफसफाई पालिका करते. ब्रिटिशकालीन अवशेष, पायऱ्या व बुरूज यांवर वाढलेले गवत कापणे तसेच पडझड झालेल्या गोष्टींची देखभाल पुरातत्त्व खाते गरज पडेल त्याप्रमाणे करते. किल्ल्याच्या डागडुजीला येणारा खर्च याबद्दल पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला. तसेच माध्यमांना याबद्दल आम्ही कोणतीही माहिती देऊ शकत नाही असे सांगण्यात आले.

किल्ल्यामध्ये उद्यानाव्यतिरिक्त कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. प्रशासनाने या किल्ल्याची डागडुजी केल्यास मुंबईकरांसाठी हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.- प्रशांत लोखंडे, गडप्रेमी 

Web Title: Sion's historic fort awaits repair; Neglected by the Department of Archeology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.