साहेब, एक दिवसाचे वाहतूक पोलीस व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:04 AM2019-08-30T06:04:59+5:302019-08-30T06:05:29+5:30

परिवहनमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध; भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पोलीस दलात नाराजी

Sir, be a one-day traffic cop! police argue for diwakar rawate | साहेब, एक दिवसाचे वाहतूक पोलीस व्हा!

साहेब, एक दिवसाचे वाहतूक पोलीस व्हा!

Next

मुंबई : नवीन नियमानुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली. वाढलेल्या रकमेमुळे पोलिसांच्या भ्रष्टाचारात वाढ होईल, असे वक्तव्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. या वक्तव्यामुळे पोलीस दलातून नाराजीचा सूर उमटत आहे. एकाने पैसे घेतले म्हणून संपूर्ण पोलीस दलालाच त्या नजरेने पाहणे चुकीचे आहे. ‘साहेबांनी एक दिवस रस्त्यावर उभे राहून वाहतूक पोलिसांसारखे काम करून दाखवावे,’ असे मत नाराज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले. रावते यांच्या वक्तव्यावर काही पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केलेल्या भावना...


...त्यापेक्षा पोलिसांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा
उन्हापावसात रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियोजन करायचे. नियमांबाबत कुणाला काही सांगायला गेले तर त्यांच्याकडून अनेकदा मारहाणीच्या घटना घडतात. त्यातही केवळ लोकसेवक म्हणून शांतपणे बघतो. पण यासाठीही वरिष्ठ नेतेमंडळीच जबाबदार आहेत. एकाने पैसे घेतले म्हणून सर्वांना भ्रष्ट म्हणणे चुकीचे आहे. परिवहनमंत्र्यांसारख्या नेत्याने असे बोलून त्यावर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. अशी मुक्ताफळे उधळण्यापेक्षा, पोलिसांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई वाहतूक विभाग


एसीबीकडे जावे
पैसे कोणी घेत असल्यास जनतेने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) जावे. एकाने पैसे घेतले म्हणून सगळेच भ्रष्ट होत नाहीत. वाढत्या दंडाच्या रकमेमुळे त्यांना धाक बसेल. ‘ई चलान’ प्रक्रियेमुळे कुणाला पैसे घेण्यास वाव नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचा संबंधच नाही.
- प्रभाकर धमाले, निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर, वाहतूक विभाग.

‘ई चलान’मुळे भ्रष्टाचारास संधी नाही
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पावतीद्वारे दंडवसुली करण्यात येत होती. आता मशीनद्वारे कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलीस मशीनमध्ये लॉगइन करून जरी बाहेर पडले तरी, अबाउट कॉलची माहिती वरिष्ठांना जाते. ‘ई चलान’मुळे वाहतूक पोलिसांना भ्रष्टाचार करण्यास संधी नाही. त्यामुळे रावतेंनीही त्याचा अभ्यास करायला हवा.
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, मुंबई

नोकरी कोण धोक्यात घालणार?
एक किंवा दोन टक्के लोक भ्रष्टाचार करीत असतील; पण त्यामुळे सर्वांनाच त्या नजरेने पाहणे चुकीचे आहे. सातव्या वेतन आयोगाने वाहतूक पोलिसांचा पगार चांगला वाढला आहे. १००-२०० रुपयांसाठी नोकरी कोणीही धोक्यात घालणार नाही. आरोप करण्यापेक्षा पोलिसांच्या समस्यांसाठी पुढाकार घ्या.
- पोलीस हवालदार, वाहतूक विभाग, मुंबई


गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत
वाढीव रकमेमुळे वाहनचालक नियम मोडताना विचार करतील. दंड जास्त असल्यामुळे त्यांच्या खिशाला झळ बसेल. वाहनचालकांमध्ये सुधारणा होईल आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. पण भ्रष्टाचाराचा आरोप होणे चुकीचे आहे.
- बाळासाहेब घाडगे, निवृत्त पोलीस अधिकारी

जनतेच्याही मनावर चुकीची छाप
पोलिसांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. त्याला असे मंत्रीही जबाबदार आहेत. आजही पोलिसांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कामाचा वाढता व्याप, त्यामुळे येणारा ताण, अपुरे मनुष्यबळ तसेच पोलिसांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- साहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, मुंबई

भ्रष्टाचारास नागरिक कारणीभूत
नवीन कायद्यामध्ये दंड वाढविला तर वाहतूक पोलिसांचा भ्रष्टाचार वाढेल, असे म्हणणे चुकीचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर नागरिक पैसे वाचविण्यासाठी लाच देतात. वाहतूक पोलिसांपेक्षा नागरिक भ्रष्टाचारास जास्त जबाबदार आहेत.
- पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

...तरच कारवाई शक्य
ज्याच्याकडून पैसे मागितले अथवा घेतले असतील ते या प्रकरणी तक्रार करतील. असे झाले तरच अशा प्रकरणात कारवाई करणे शक्य आहे.
- प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालकं

Web Title: Sir, be a one-day traffic cop! police argue for diwakar rawate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.