मुंबई - देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला असून १७ मे पर्यंत देशात लॉकडाऊन राहणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने घोषित केले आहे. मात्र, ४ तारखेपासून देशातील विविध राज्यांमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार, काही उद्योगधंदे आणि दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, पररराज्यात अडकलेल्या मजुरांनाही त्यांच्या गावी पोहोचविण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. त्यासाठी श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आली असून सध्या शेल्टर होममध्ये असलेल्या नागरिकांना प्राधान्याने त्यांच्या राज्यात सोडण्यात येत आहे. आपल्या राज्यात जाण्यासाठी या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. तर, राज्यात अडकलेल्या नागरिकांनाही त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
राज्य सरकारनेही आदेश जारी करत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक आणि मजूरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज सादर करायचा आहे. जवळील पोलीस स्टेशनला किंवा महाराष्ट्र पोलीसच्या covid19mahapolice.in या संकेत स्थळावरुन ऑनलाईन हा अर्ज सादर करावयचा आहे. सरकारच्या या शिथिलतेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात अडकलेले नागरिक गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रुग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत.
मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील एका खासगी रुग्णालयाबाहेर वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोमवारी दारुच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, मात्र रुग्णालयाबाहेरही अशाच रितीने रांगा लागल्या आहेत. परराज्यातील मजूर आणि आपल्या गावाकडे जाण्यास इच्छुक असलेले नागरिक या प्रमाणपत्रासाठी घराबाहेर पडले आहेत. सोशल डिस्टन्स पाळण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, गर्दीतील नागरिकांना हे भान नसल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सरकारी रुग्णालयाबाहेर अशीच गर्दी जमा होत आहे.