मुंबई : सर जे. जे. समूह रुग्णालय म्हणजे, राज्य सरकारचे सर्वात जुनी आणि मोठी रुग्णालये. राज्यात कितीही मोठी आपत्कालीन परिस्थिती ओढविली तरी सर जे. जे. समूह रुग्णालय केव्हाच शांत झाले नव्हते. ते गेल्या सात दिवसांत शांत पाहावयास मिळाले. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाची झळ बसली. एका दिवसाला ११० ते १३० शस्त्रक्रिया होणाऱ्या या रुग्णालयांमध्ये दिवसाला पाच शस्त्रक्रिया होत होत्या. रुग्णलयातील वॉर्ड रिकामे झाल्याचे चित्र दिसत होते.
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ५४ दिवसांचा राज्य कर्मचाऱ्यांचा संप पुकारला गेला होता. त्यानंतर यावेळी पहिल्यांदाच जुन्या पेन्शनच्या या मुख्य मागणीसाठी सात दिवसांचा कर्मचाऱ्यांनी पुकारला होता. यामुळे सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जी. टी., कामा आणि सेट जॉर्जेस रुग्णालयातील कामावर त्याचा विपरित परिणाम झाला. शहरातून तसेच राज्याच्या विविध भागांतून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र त्यांना संपाचा मोठा फटका बसला. बाह्य रुग्ण विभागात फारच कमी प्रमाणात रुग्ण येत होते. रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि वरिष्ठ डॉक्टर त्यांना जमेल त्या पद्धतीने रुग्णांची तपासणी करत होते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले की, सात दिवस कर्मचाऱ्यांचा संप ही बहुधा दुसरीच घटना असावी. आम्ही एमबीबीएसला असताना एकदा मोठा संप जो ५० दिवसांच्यावर चालला होता. त्यावेळी रुग्णलयात कर्मचारी नव्हते. एक आणि दोन दिवसांचा लाक्षणिक संप यापूर्वी झाला होता, असे ते म्हणाले.
आम्ही जमेल त्या पद्धतीने रुग्णालय चालविण्याचा प्रयत्न करत होतो. संपाचा परिणाम नियमित उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्ण संख्येवर, शस्त्रक्रियांवर, ओपीडीवर दिसत होता. तरीही आमचे सर्व डॉक्टर रुग्णसेवा देत होते. त्याचा वेगळा परिणाम म्हणजे आमच्याकडे ६० ते ७० रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल होते. आजही अतिदक्षता विभागातील बेड रिकामा नाही. कारण हा विभाग पूर्णपणे डॉक्टर सांभाळत होते. -डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, सर जे. जे. समूह रुग्णालय