Join us

साहेब, ही गर्दी पाहा... प्रवाशांची संख्या कमी म्हणणाऱ्या रेल्वेमंत्र्यांसाठी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 6:38 PM

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेक श्रमिक, कामगारांना गावी जाण्यास भाग पाडले. अनेक कामगारांनी गाव गाठण्यासाठी शेकडो कि.मी.चे अंतर पायीच कापले.

मुंबई : पाठीवर बॅग, हातात अवजड गाठोडे घेऊन अनेक मजूर, कामगारांनी रेल्वेस्टेशन गाठत आहेत. मात्र, येथून कोणतीही रेल्वे धावणार नसल्याचे कळताच अनेकजण निराश होऊन माघारी परतत आहेत. तर, रेल्वे गाड्यांच्या वेळात होणाऱ्या बदलांमुळे शेकडो प्रवासी मजुरांना तासन तास ताटकळत बसावे लागत आहे. 

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेक श्रमिक, कामगारांना गावी जाण्यास भाग पाडले. अनेक कामगारांनी गाव गाठण्यासाठी शेकडो कि.मी.चे अंतर पायीच कापले. रेल्वे रुळावरून गावाकडे पायी जाणाऱ्या श्रमिकांचा रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने देशभरात हळहळ व्यक्त झाली. शासनाने विविध राज्यांतील मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या. मुंबईतील विविध रेल्वे स्टेशनवरूनही विविध राज्यांतील श्रमिकांना घेऊन रेल्वे रवाना झाल्या. त्यातून हजारो प्रवासी गावी रवाना झाले; परंतु अद्यापही अनेक कामगार गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रेल्वेने गावी जाता येईल, या आशेने रेल्वेस्टेशन गाठत आहेत.

प्रवासी मजूरांना सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्रालयाकडे बोट दाखवल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन महाराष्ट्र सरकारकडे गाड्यांची यादी मागितली होती. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारनेही काही रेल्वे गाड्यांची यादी दिली. त्यावर, रेल्वेमंत्र्यांनी आज ट्विट करुन प्रवाशांची संख्या कमी असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर आम्ही १४५ श्रमिक रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली. आज सकाळापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ५० रेल्वेगाड्या जायला हव्या होत्या. मात्र, प्रवाशांची संख्या कमी असल्याने केवळ १३ च ट्रेन गेल्या आहेत, असे गोयल यांनी म्हटले होते. गोयल यांच्या या ट्विटला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलंय.   

वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत, साहेब या गर्दीकडे लक्ष द्या, असे म्हटलंय. रेल्वे स्थानकावर स्थलांतरीत मजूरांची उशिरा गर्दी होताना दिसत आहे. रेल्वेचं नियोजित वेळापत्रक कौतुकास्पद असल्याचं, म्हणत वर्षा गायकवाड यांनी पियुष गोयल यांना टोलाग लगावला आहे. शिक्षणमंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मजुरांची गर्दी दिसत असून हे मजूर मुंबईतून आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जमा झाले आहेत. 

 

टॅग्स :मुंबईरेल्वेस्थलांतरणवर्षा गायकवाडपीयुष गोयल