मुंबई: राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार उद्या (दिनांक २७ सप्टेंबर) रोजी दुपारी दोन वाजता मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. तसेच ईडीच्या कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये असे आवाहन शरद पवारांनी केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माफ करा साहेब, यावेळेस पहिल्यांदा तुमचे ऐकणार नसल्याचे ट्विट केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले की, माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे ऐकणार नाही. कारण तुमच्या महाराष्ट्र घडवताना होणाऱ्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा मात्र तरीपण तुम्ही लढत आहात आणि हे सर्व तुम्ही सगळं आमच्यासाठी सोसलय यामुळे उद्याच्या दिवसासाठी माफ करा असं लिहिण्यात आले आहे.
दरम्यान, काल पत्रकार परिषद घेऊन 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता मी ईडी कार्यालयात हजर होईन. जो काही पाहुणचार असेल तो स्वीकारणार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. तसेच, महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. आम्हाला दिल्लीसमोर झुकणे माहिती नाही. आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल प्रतिक्रिया दिली. याशिवाय, ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई कशी? असे म्हणत शरद पवार यांनी सरकार आणि भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता ईडीने सुद्धा या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.