लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याने त्रस्त असलेले नागरिक आपल्या तक्रारी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. मात्र कधी बैठका तर कधी साहेब बाहेर असल्याचे सांगून तक्रारदारांच्या भेटी नाकारण्यात येतात. तेव्हा जिल्हाधिकारी भेटत नसल्याने तक्रार घेऊन कार्यालयात किती वाजता येऊ साहेब, अशी विचारणा त्रस्त तक्रारदार करीत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ३ ते ५
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ३ वाजेनंतर नागरिक किंवा तक्रारदारांना जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
१५ जणांच्या तक्रारी ऐकल्या
दररोज ३ वाजेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी लोक येत असतात. कधी मोर्चाचे शिष्टमंडळ असते, तर कधी एकत्र नागरिक येऊन भेटतात. भेटायला येणाऱ्यांची संख्या कधी ५ असते, तर कधी १५ होते. सगळ्यांच्या तक्रारी ऐकून घेतात, असे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे.
कशासाठी लोक येतात?
मुंबईत जिल्हाधिकारी दोन जिल्ह्यात विभागले आहेत. त्यांच्या हद्दीतील पेन्शन रखडणारे, एसआरएमुळे वादात असलेले कुटुंबे, जमिनीच्या प्रश्नांसाठी, बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार घेऊन नागरी प्रश्नांसाठी येणारे मोर्चे, शिष्टमंडळ आणि आंदोलक यांना जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटायचे असते.
पुढे काय होते या तक्रारींचे?
तक्रारी ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित विभागाकडे त्या वर्ग करतात अथवा त्यांच्या अधिकारात असेल तर त्यावर योग्य तो निर्णय देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात.
नागरिकांना आपल्या समस्या, प्रश्न, तक्रारी मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ३ नंतर भेटण्याची व्यवस्था असते. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखी तक्रारी असतील तर मुख्यमंत्री तक्रार कक्षही स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून ते आपल्या तक्रारींचा पाठपुरावा करू शकतात. -राजीव निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई