Video: लेकरा, शेतकऱ्याला कुठं असतीय रिटारमेंट, पोटात कालवणारी 'दुबार पेरणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 05:39 PM2020-07-04T17:39:34+5:302020-07-04T18:32:55+5:30

धामणगावातील नरहरी ढेकणे यांना थोडीशी कोरडवाहू जमिन असून त्याच्यावरच गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

Sir, where is the retirement for the farmer, double sowing of farmer in solapur | Video: लेकरा, शेतकऱ्याला कुठं असतीय रिटारमेंट, पोटात कालवणारी 'दुबार पेरणी'

Video: लेकरा, शेतकऱ्याला कुठं असतीय रिटारमेंट, पोटात कालवणारी 'दुबार पेरणी'

Next
ठळक मुद्दे धामणगावातील नरहरी ढेकणे यांना थोडीशी कोरडवाहू जमिन असून त्याच्यावरच गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.मग, 80 वर्षीच्या राजा-राणीनं चपापत्या उन्हात काम हाती घेतलं अन् आता थकलोय पण अजून हरलो नाही, असा संदेशच त्यांनी दिला.

मयूर गलांडे/सुहास ढेकणे

मुंबई/सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार दिवसांपूर्वी देशातील 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्यावेळी, हे धान्य सरकार तुम्हाला मोफत देऊ शकतंय ते केवळ बळीराजामुळेच. शेतात घाम गाळून, कष्ट करुन मातीतून सोनं पिकविणाऱ्या माझ्या शेतकऱ्यामुळेच मी हे धान्य तुम्हाला देतोय, असे मोदींनी आवर्जुन सांगितले. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील धामणगावच्या एका वृद्ध दाम्पत्याकडे पाहिल्यानंतर मोदींचं ते वाक्य शतप्रतिशत सत्यवचन असल्याची प्रचिती येते. कारण, आपल्या कोरडवाहू शेतात दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जातानाही 80 वर्षीय नरहरी ढेकणेंमधला कष्टकरी बळीराजा आपल्याला अन्नपूर्णाची साक्ष देतोय.   

कोरोनाच्या काळात देश लॉकडाऊन असतानाही बळीराजाचं काम रात्रंदिवस सुरु होतं. ज्वारी काढायचीय, कांदा काढायचाय, पिकाला पाणी द्यायचंय, फवारणी करायचीय, खुरपणी करायचीय, बागांकडं लक्ष द्यायचंय.... अशी एक ना अनेक कामे शेतकऱ्याच्या शेतात बारमाही सुरुच असतात. त्यामुळेच, शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात सरकारनं शिथिलता दिली. कारण, जग लॉकडाऊन झालं तरी माणूस जगू शकतं. मात्र, शेतकरी लॉकडाऊन झाल्यावर कुणीच जगू शकणार नाही हे सरकारला चांगलच माहिती असतं. म्हणूनच, शेतात राबणाऱ्या नरहरी बाबांना भेटल्यावर म्हटलं, आता घ्या की रिटायरमेंट शेतीतून. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरानं मीही स्तब्ध झालो. 'लेकरा, शेतकऱ्याला कसला आईतवार अन् कसली रिटारमेंट, असे 80 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी असलेले नरहरी ढेकणेंनी हसत हसत म्हटले'. आपल्या कोरोडवाहू जमिनीत 75 वर्षीय पत्नी सोजरसह दुबार पेरणी करतानाचा त्यांचा व्हिडिओ पाहून तुमच्या पोटाला पीळ पडला नाही तर नवलचं.   

धामणगावातील नरहरी ढेकणे यांना थोडीशी कोरडवाहू जमिन असून त्याच्यावरच गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. वयाची साठी ओलांडली की माणसानं आराम करावा, नातवंडात रमावं अन् आनंदी जीवन जगावं असं म्हटलं जातं. पण, नरहरी ढेकणे व सोजर ढेकणे या वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या नशिबी हे सुख नाही. मुलबाळ नसल्याने वयाच्या 80 व्या वर्षीही संसाराचा गाडा स्वतःलाच हाकावा लागतोय. गावात रहायला पक्के घर नसल्याने आजही पत्र्याच्या शेडमध्येच या राजा-राणीचा प्रेमाचा संसार सुरु आहे. आपल्या शेतात थोडंस पिक घेऊन, त्यातून थोडासा पैसा मिळवून उरलेला आयुष्य जगायचा दिनक्रम या जोडप्याचा आहे. राजानं मारलं अन् पावसानं झोडपलं... मग सांगणार कोणाला, अशीच परिस्थिती सध्या ढेकणे दाम्पत्याची झाली आहे.

पहिल्या पावसानंतर शेतात मोठ्या कष्टानं सोयाबीन पेरले पण उगवलचं नाही. बियाणं देणाऱ्या कंपनीनं जशी इतर शेतकऱ्यांची फसवणूक केली, तशीच यांचीही फसवणूक झाली. आता, सांगायचं कुणाला अन् ऐकणार तरी कोण?. सरकारी दफ्तरात हेलपाटे घालायला अंगात ताकद तरी नको का. मग, त्यापेक्षा आपल्या शेतातच दुबार पेरणी करणं या आजी-आजोबांना सोयीचं वाटलं. त्यामुळेच, एक नळा घेतला, वरती वाटी अन् खाली फारुळा बसवून तयार केलं पेरणीयंत्र. पेरणीच्या या गाडीला इंधन तरी काय? कष्ट करुन झिजलेल्या हाडातील उरलंसुरलं रक्त अन् अडखळत अडखळत पुढे जाणारी चार पाऊलं. 

कधी लहरी मान्सूनमुळे तर बियाणांच्या फसवणुकीमुळे, पण दुबार पेरणी जणू पाचवीलाच पुजलेली. शेतात शेतीकामासाठी बैल नाहीत आणि मजूराला द्यायला पैसाही नाही. मग, 80 वर्षीच्या राजा-राणीनं चपापत्या उन्हात काम हाती घेतलं अन् आता थकलोय पण अजून हरलो नाही, असा संदेशच त्यांनी दिला. गेल्या पन्नास पंचावन्न वर्षांपासून काळ्या मातीची सेवा करणाऱ्या या वृध्द दांपत्याला सध्या आधार आहे तो केवळ एकमेकांच्या थरथरत्या हातांचा. तेच हात हातात घेऊन दोघेही कधी शेतात धावतात, तर कधी घरात राबतात. जीवनात संघर्ष कुणाला चुकलाय, पण या माय-बाप शेतकऱ्याचं संपूर्ण जीवनचं संघर्षमय बनलयं. या माय-बाप शेतकऱ्याच व्हिडिओ पाहून अमोल पाटील नामक एका युवकांना त्यांना दोन महिन्यांचा किराणा भरुन देण्याचं काम केलं. तर, ही दुबार पेरणी पाहून कित्येकांच्या पोटात कालवलं.

Web Title: Sir, where is the retirement for the farmer, double sowing of farmer in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.