मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. शिवसेनेनं ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली होती. परंतु शिवसेनेची ही मागणी धुडकावून अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करत असतानाच मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्राच्या बाजूला साहेब आपण करुन दाखवलतं असं लिहून माझा आमदार माझा मुख्यमंत्री असं लिहण्यात आलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक हाजी हलीम खान यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे.
शिवसेनेनं याआधी देखील मुख्यमंत्री शिवसेनेचाचं असं म्हणत पोस्टरबाजी केली होती. त्यानंतर पुन्हा माझा आमदार माझा मुख्यमंत्री असं लिहत मातोश्री बाहेरच्या पोस्टरबाजीमुळे भाजपा- शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवतीर्थावर शपथविधी संपन्न होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. भाजपासोबतच्या चर्चेस शिवसेनेकडून कोणतीही अडचण नाही. खोटं बोलणारी, टोपी फिरवणारी मंडळीच चर्चेतला प्रमुख अडथळा आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजापवर तिखट शब्दांत निशाणा साधला होता. उद्धव अंतिम निर्णयापर्यंत आले असून आमचं गणित जमल्यावर ते माध्यमांसमोर मांडू, असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, एवढेच सांगितले. मात्र युतीचे सरकार येणार की भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार या बाबतची संदिग्धता कायम ठेवली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.